बंगळुरू : मॅच फिक्सिंगचं भूत पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये समोर आलं आहे. आयपीएलच्या धर्तीवर सुरु झालेल्या कर्नाटक प्रिमियर लीग(केपीएल) मध्ये मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. याआधी केपीएलशी जोडल्या गेलेल्या एका टीमच्या प्रशिक्षकालाही अटक करण्यात आली होती. बंगळुरूमध्ये भारतीय क्रिकेटपटू निशांत सिंह शेखावत याला सट्टेबाजीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. केपीएलमध्ये मॅच फिक्सिंग केल्याच्या आरोपावरुन निशांत सिंहला अटक केली आहे, अशी प्रतिक्रिया बंगळुरूचे संयुक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) ए.पाटील यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निशांत सिंह शेखावत सट्टेबाजांच्या संपर्कात होता. खेळाडूंनी मॅच फिक्स करावी यासाठी त्याने बंगळुरू ब्लास्टर्स टीमचे बॉलिंग प्रशिक्षक विनू प्रसादशीही संपर्क केला होता. विनू प्रसादला याआधीच फिक्सिंग प्रकरणी अटक झाली आहे.


बंगळुरू ब्लास्टर्स टीमचे बॉलिंग प्रशिक्षक विनू प्रसाद आणि बॅटिंग प्रशिक्षक विश्वनाथन यांना मागच्या आठवड्यात शुक्रवारी मॅच फिक्सिंगच्या वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अटक झाली. मागच्या वर्षी बंगळुरू ब्लास्टर्स आणि बेळगावी पँथर्समध्ये झालेल्या मॅचमध्ये फिक्सिंग केल्याचा आरोप, प्रशिक्षकांवर आहे.


दुसरीकडे मागच्याच महिन्यात केपीएलची टीम बेळगावी पँथर्सचा मालक अशफाक अली थारा यालाही सट्टेबाजीमध्ये सामील झाल्याच्या आरोपात बंगळुरूमधूनच अटक करण्यात आली. कर्नाटक राज्य क्रिकेट संघाने १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान केपीएलचं आयोजन केलं होतं.


पर्यटन व्यवसाय असलेल्या अशफाक अली थाराने २०१७ साली बेळगावी पँथर्स टीम विकत घेतली होती. केंद्रीय गुन्हे शाखेने अनेक दिवस चौकशी केल्यानंतर अशफाकला अटक केली. अशफाकशिवाय केपीएलशी जोडल्या गेलेल्या इतर टीमच्या खेळाडूंचीही चौकशी करण्यात आली.