कार्डिफ : भारतीय टीमच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ८ विकेटनं शानदार विजय झाला. कुलदीप यादवनं घेतलेल्या ५ विकेट आणि लोकेश राहुलनं केलेल्या शतकामुळे भारतानं ही मॅच जिंकली. या सीरिजसाठी भारतानं नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. दीपक चहर आणि कृणाल पांड्याची या सीरिजसाठी निवड करण्यात आली. जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाल्यामुळे या दोघांची या सीरिजमध्ये शेवटच्या क्षणी निवड झाली. चहर आणि कृणाल पांड्याची भारतीय टीमनं ओळख परेड करून घेतली. प्रशिक्षक रवी शास्त्रीसमोरच या दोघांचं रॅगिंग करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा ओपनर शिखर धवननं रॅगिंगचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दीपक चहर पहिल्यांदा त्याच्याबद्दल माहिती देताना दिसत आहे. माझं नाव दीपक चहर आहे. आग्र्याचा असूनही मी राजस्थानकडून रणजी खेळतो. भारताचं प्रतिनिधीत्व करण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तुमच्यासोबत खेळून मला खूप आनंद होईल, असं चहर म्हणाला आहे. यानंतर कृणाल पांड्यानं त्याची ओळख करून दिली. मला खूप छान वाटत असल्याचं कृणाल म्हणाला.