९०० अब्जांची संपत्ती तरी क्रिकेटमध्ये संघर्ष, आर्यमन बिर्लाचं खणखणीत शतक
राजकारण्याचा मुलगा राजकारणी, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर आणि उद्योजकाचा मुलगा उद्योजक झालेला आपण नेहमीच पाहतो.
मुंबई : राजकारण्याचा मुलगा राजकारणी, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर आणि उद्योजकाचा मुलगा उद्योजक झालेला आपण नेहमीच पाहतो. पण या सगळ्याला काही अपवादही असतात. भारताचे दिग्गज व्यावसायिक कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आर्यमन बिर्लाही अशातलाच एक आहे. २१ वर्षांचा आर्यमन वडिलांचा व्यवसाय सांभळण्याऐवजी क्रिकेटच्या मैदानात घाम गाळतोय. आर्यमननं रणजी ट्रॉफीच्या मॅचमध्ये शतकही झळकवत स्वत:मधली क्षमता दाखवली आहे. बंगालविरुद्धच्या मॅचमध्ये मध्य प्रदेशकडून खेळताना आर्यमन बिर्लानं १८९ बॉलमध्ये नाबाद १०३ रन केले.
फोर्ब्स मासिकाच्या यादीनुसार कुमार मंगलम बिर्ला २०१७ साली भारतातले आठवे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते. कुमार मंगलम बिर्ला यांची संपत्ती १२.६ अब्ज डॉलर म्हणजेच ९०० अब्ज रुपये आहे. आयपीएलमध्ये आर्यमन बिर्ला राजस्थानच्या टीमचा भाग आहे. माझ्या आडनावामुळे माझ्यावर दबाव आहे. माझ्या आडनावामागे एक विरासत आहे ज्यावर माझं प्रेम आहे. पण जेव्हा तुम्ही मैदानात खेळत असता तेव्हा तुमचं लक्ष हे फक्त बॉलवर ठेवावं लागतं. इकडे जे आहे ते फक्त २२ यार्डाचं पिच आहे, असं आर्यमन बिर्ला म्हणाला.
मी स्वत:ला भाग्यवान समजतो. माझं कुटुंब हे माझ्यासाठी रोल मॉडेल आहे. आयुष्यात सगळ्यांना महत्वाकांक्षा असतात. मलाही शिकायचं आहे, असं वक्तव्य आर्यमननं केलं. आई-वडिल मला नेहमीच पाठिंबा देतात. कौटुंबिक व्यवसायात भाग घ्यावा यासाठी कोणताच नियम नाही. प्रत्येक व्यक्ती कोणत्यातरी कुटुंबात जन्म घेते. यामुळे तुमच्या कामात अडथळा येत नाही, अशी प्रतिक्रिया आर्यमननं दिली.
आयपीएलच्या मागच्या वर्षी झालेल्या लिलावामध्ये राजस्थाननं आर्यमनला ३० लाख रुपयांनना विकत घेतलं. आयपीएलच्या लिलावात आर्यमनची बेस प्राईज २० लाख रुपये होती. पहिल्या दिवशी झालेल्या लिलावामध्ये आर्यमनवर कोणत्याच टीमनं बोली लावली नव्हती. अखेर राजस्थाननं आर्यमनला दुसऱ्यांदा लागलेल्या बोलीत विकत घेतलं.