कोलंबो : श्रीलंकेचा महान क्रिकेटर कुमार संघकारा यानं आपला राजकारणात प्रवेश करण्याचा कोणताही मानस नसल्याचं स्पष्ट केलंय. स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, संघकाराची नजर पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवर टिकून राहिल्यात. साहजिकच, त्याची तुलना पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर इमरान खान याच्यासोबत केली जातेय. इमरान खान येत्या शनिवारी अर्थात १८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझी राजकीय पदाविषयी कोणतीही महत्त्वकांक्षा नाही हे मी अनेकदा स्पष्ट केलंय, असं संघकारानं स्पष्ट केलंय. 



श्रीलंकेच्या सत्ताधारी आघाडीनं आणि मुख्य विरोधकांच्या गटानं आत्तापर्यंत पुढल्या वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. देशाचे अनेक दिग्गज क्रिकेटर राजकारणात यशस्वी ठरलेत. श्रीलंकेचा विश्वकप विजेता माजी कॅप्टन अर्जुन रणतुंगा सद्य सरकारमध्ये मंत्री आहे तर माजी कॅप्टन सनथ जयसूर्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर उपमंत्री आहेत. 


कुमार संघकारानं २०१५ साली श्रीलंकेसाठी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. संघकारानं पी. सारा ओवलमध्ये सोमवारी संपुष्टात आलेल्या भारताविरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलाय. श्रीलंकेला ही मॅच २७८ रन्सनं गमवावी लागलीय. संघकारानं आपल्या करिअरमध्ये खेळलेल्या १३४ टेस्ट मॅचमध्ये ३८ शतक आणि ५२ अर्धशतकांच्या मदतीनं १२,४०० रन्स केले.