मुंबई : दक्षिण आफ्रिकेकडून खेळलेल्या काईल अबॉटच्या नावावर या शतकातल्या सर्वोत्तम बॉलिंगची नोंद झाली आहे. अबॉट काऊंडी चॅम्पियनशीप डिव्हिजन २०१९मध्ये हॅम्पशायरकडून खेळत आहे. समरसेटविरुद्धच्या मॅचमध्ये अबॉटने तब्बल १७ विकेट घेतल्या आङेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमधली या शतकातली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. अबॉटच्या या शानदार बॉलिंगमुळे हॅम्पशायरने समरसेटचा १३६ रननी पराभव केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काईल अबॉटने या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ९ विकेट आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ८ विकेट घेतल्या. समरसेटची पहिली इनिंग १४२ रनवर आणि दुसरी इनिंग १४४ रनवर ऑलआऊट झाली. हॅम्पशायरने पहिल्या इनिंगमध्ये १९६ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये २२६ रन केले होते.


या मॅचमध्ये काईल अबॉटने ८६ रन देऊन १७ विकेट घेतल्या. जिम लेकर यांच्या १९ विकेटच्या कामगिरीनंतर ही सर्वोत्तम कामगिरी आहे. जिम लेकर यांनी १९५६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९० रन देऊन १९ विकेट घेतल्या होत्या. लेकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगमध्ये ९ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये १० विकेट घेतल्या होत्या. टेस्ट क्रिकेटमधली ही अजूनही सर्वोत्तम कामगिरी आहे.


साऊथम्पटनमध्ये झालेल्या या मॅचमध्ये समरसेटकडून खेळणाऱ्या मुरली विजयला दोन्ही इनिंगमध्ये अबॉटने आऊट केलं. मुरली विजय पहिल्या इनिंगमध्ये शून्यवर आणि दुसऱ्या इनिंगमध्ये २९ रनवर आऊट झाला.


३२ वर्षांच्या काईल अबॉटने शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच २०१६ साली खेळली. यानंतर कोल्पाक करार केल्यामुळे अबॉट दक्षिण आफ्रिकेकडून खेळू शकला नाही. अबॉटने ११ टेस्टमध्ये ३९ विकेट, २८ वनडेमध्ये ३४ विकेट आणि २१ टी-२०मध्ये २६ विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये अबॉट किंग्स इलेव्हन पंजाब आणि पुणे वॉरियर्सकडून खेळला आहे.