मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांची झिम्बाब्वेच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. लालचंद राजपूत यांनी भारताकडून २ टेस्ट आणि ४ वनडे खेळल्या होत्या. राजपूत यांनी याआधी अफगाणिस्तानचे प्रशिक्षक म्हणून २ वर्ष काम केलं होतं. या कालावधीमध्ये अफगाणिस्तानच्या टीमनं चांगली कामगिरी केली होती. आता झिम्बाब्वेची कामगिरी सुधारण्याचं आव्हान राजपूत यांच्याकडे असणार आहे. २००७ साली भारतानं टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. या टीमचे मॅनेजर लालचंद राजपूत होते. २००८ सालच्या आयपीएलमध्ये राजपूत मुंबईचे प्रशिक्षक होते. पण यावेळी ते वादात सापडले. हरभजननं श्रीसंतच्या थोबाडात मारल्यानंतर राजपूत यांचा हसतानाचा फोटो कॅमेरामध्ये कैद झाला होता.


लालचंद राजपूत यांना २०१६ साली अफगाणिस्तानचे प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आलं. इंजमाम उल हकच्या ऐवजी राजपूत यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. राजपूत प्रशिक्षक असताना अफगाणिस्ताननं वेस्ट इंडिजला त्यांच्याच देशात एका वनडेमध्ये मात दिली. यानंतर अफगाणिस्तानला वनडे टीमचा दर्जा मिळाला. पण २०१८ साली राजपूत यांचा करार अफगाणिस्तान बोर्डानं वाढवला नाही. आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू फिल सिमन्स यांना प्रशिक्षक केलं. आता राजपूत यांच्याकडे झिम्बाब्वेचं क्रिकेट सुधारण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.