लीड्स : इंग्लंडविरुद्धची टी-२० सीरिज जिंकल्यावर भारताला वनडे सीरिजमध्ये २-१नं पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीच्या काही निर्णयांवर टीका होत आहे. लोकेश राहुलला तिसऱ्या वनडेमध्ये संधी न दिल्यामुळे कोहलीवर जोरदार निशाणा साधण्यात येत आहे. लोकेश राहुल टी-२० सीरिजमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये होता. टी-२० मॅचमध्ये राहुलनं शतकही लगावलं होतं. पण दुसऱ्या वनडेमध्ये राहुल शून्यवर आऊट झाला आणि तिसऱ्या वनडेमध्ये त्याच्याऐवजी दिनेश कार्तिकला संधी मिळाली. विराटच्या या निर्णयावर व्ही.व्ही.एस लक्ष्मण यानं टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकेश राहुल सारख्या तरुण खेळाडूबरोबर झालेला हा व्यवहार योग्य नाही. राहुलबद्दल घेतलेल्या या निर्णयामुळे मी निराश झालो कारण राहुलबरोबर हे पहिल्यांदाच झालेलं नाही. राहुल फक्त एका इनिंगमध्ये अपयशी ठरला होता, असं लक्ष्मण म्हणाला. लोकेश राहुलसारख्या तरुण खेळाडूला मिळालेली वागणूक योग्य नसल्याची प्रतिक्रिया लक्ष्मणनं दिली.


इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये राहुलनं शतक केलं होतं. तर वनडे सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये राहुल १८ बॉलवर ९ रन बनवून नाबाद राहिला. पहिल्या वनडेमध्ये राहुल बॅटिंगला आला तेव्हा भारत विजयाच्या जवळ पोहोचला होता. दुसऱ्या वनडेमध्ये राहुल दुसऱ्या बॉलला शून्यवर आऊट झाला. तिसऱ्या वनडेमध्ये राहुलऐवजी दिनेश कार्तिकला संधी मिळाली. पण कार्तिकनं २१ बॉलमध्ये २२ रन केल्या. सुरेश रैनाही या सीरिजमध्ये फॉर्ममध्ये दिसला नाही. दुसऱ्या वनडेमध्ये रैनानं ४६ रन केले तरी तो संघर्ष करताना दिसला.


बॅट्समनमुळे पराभव


तिसऱ्या वनडेमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताला ५० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून फक्त २५६ रन करता आले. इंग्लंडनं या लक्ष्याचा पाठलाग ४५ ओव्हरमध्येच केला. जो रूटनं शानदार शतक केलं तर कर्णधार इओन मॉर्गननं ८८ रन केले. भारताकडून कर्णधार विराट कोहलीनं सर्वाधिक ७१ रन केले. तर धवननं ४४ आणि धोनीनं ४२ रन केले. शेवटच्या काही ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारनं २१ आणि शार्दुल ठाकूरनं २२ रन केल्यामुळे भारताचा स्कोअर २५० रनच्या पुढे गेला. दुसऱ्या वनडेमध्येही भारतीय बॅट्समननी अशाच प्रकारे निराशा केली होती.