S. Sreesanth vs Gautam Gambhir : लेजेंड्स क्रिकेट लीगच्या गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यांच्यात जोरदार वादावादी झाली. सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंना स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. मैदानावर गौतम गंभीर आणि श्रीसंतमधील वाढलेला वाद पाहून इतर खेळाडूंनी आणि अम्पायरने मध्यस्थी केली आणि दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र सामन्यानंतर श्रीसंत गौतम गंभीरबद्दल बऱ्याच काही गोष्टी बोलला. त्यामुळे आता दोन्ही खेळाडूंमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरत येथे खेळवल्या जात असलेल्या या सामन्यात गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील इंडिया कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करत गुजरातला 224 धावांचे लक्ष्य दिले होते. गौतम गंभीरने 30 चेंडूत 51 धावा केल्या. गंभीरने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. पण सामन्यादरम्यान गौतम गंभीर आणि एस श्रीसंत यांच्यात जोरदार वाद झाला. दुसऱ्या षटकात जेव्हा गंभीर स्ट्राइकवर होता आणि श्रीसंतच्या पहिल्याच चेंडूवर त्याने असा षटकार ठोकला की सर्वजण पाहतच राहिले. मिड ऑनवर गंभीरचा षटकार ठोकला. यानंतर पुढच्या चेंडूवर गंभीरने शॉट खेळला आणि समोरच्या बाजूने चौकार मारला. एक षटकार आणि एक चौकार मारल्यानंतर श्रीसंतचा संयम सुटला.


श्रीसंतचा तिसरा चेंडू डॉट होता आणि चौथ्या चेंडूवरही एकही धाव झाली नाही. चौथा चेंडू डॉट होताच श्रीसंतने गंभीरकडे रोखून पाहिले. यावर गौतम गंभीरनेही लगेच उत्तर दिले. दोघांमध्ये काहीतरी बाचाबाची झाली. त्यावेळी इतर खेळाडू आणि अम्पायरने मध्यस्थी केली आणि वाद तात्पुरता मिटवला. मात्र सामन्यानंतर इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत श्रीसंतने गौतम गंभीरवर आरोप केला आहे की त्याने सामन्यादरम्यान मला 'काहीतरी चुकीचे' म्हटले.



"मिस्टर फायटरसोबत काय झाले याविषयी मला काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. तो विनाकारण आपल्या सहकाऱ्यांशी भांडतो. आपल्या वीरू भाईचाही तो आदर करत नाही आणि आज हेच घडले आहे. कोणत्याही कारणाशिवाय तो माझ्याशी असे काहीतरी बोलत होता जे खूप वाईट होते, जे गौतम गंभीरने बोलायला नको होते. माझी काहीच चूक नव्हती. गौतम गंभीरने काय केले आहे हे लवकरच किंवा नंतर तुम्हा सर्वांना कळेल. त्याने वापरलेले आणि बोललेले शब्द क्रिकेटच्या मैदानावर मान्य नाहीत. माझे कुटुंब, माझे राज्य आणि सर्वांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. मी सर्वांच्या पाठिंब्यावर लढलो आणि आता लोक मला विनाकारण अपमानित करण्याचा प्रयत्न करतात. जे बोलले ते बोलू नये. तो काय म्हणाला ते मी तुम्हाला सांगेन," असे श्रीसंतने म्हटलं आहे.



'तुम्ही तुमच्या सहकारी खेळाडूंचा आदर करू शकत नसाल तर लोकांचे प्रतिनिधित्व करण्यात काय अर्थ आहे. शो दरम्यान, जेव्हा त्याला विराटबद्दल विचारले जाते तेव्हा तो त्याच्याबद्दल बोलत नाही. तो इतर गोष्टींबद्दल बोलतो. मला फार खोलात जायचे नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला दुखावलंय आणि तो ज्या पद्धतीने बोलला ते सांगायचं आहे. मी एक शब्दही बोललो नाही, शिवीगाळही केली नाही. तो नेहमी करतो तेच करत राहिला,' असेही श्रीसंत म्हणाला.