मुंबई : एक पाय नसलेल्या फलंदाजाला बॅटच्या आधारे उभे राहून चौकार ठोकताना पाहायचंय... एक हात नसूनही अचूक माऱ्यावर फलंदाजाची यष्टी वाकवणाऱ्या गोलंदाजाशी संवाद साधायचाय...! धड उभंही राहता येत नसले तरी मैदानात चेंडू अडविण्यासाठी धडपडणाऱ्या खेळाडूंच्या जिद्दीला सलाम ठोकायचाय... तर तुम्हाला येत्या ३० मार्चपासून मरीन लाईन्सच्या पोलीस जिमखान्यावर सुरू होत असलेल्या आठव्या आंतरविभागीय एलआयसी करंडक दिव्यांग क्रिकेट स्पर्धेला भेट द्यावीच लागेल. पाच विभागीय संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेत मुंबईकरांना देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दिव्यांग क्रिकेटपटूंसह भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचीही चौफेर फटकेबाजी अनुभवायला मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रबळ इच्छाशक्ती असली की इच्छा पूर्ण करायला आपोआप शक्ती मिळते. शरीराने दुबळे असूनही क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडण्याचे ध्येय गाठणाऱ्या दिव्यांग क्रिकेटपटूंचा अंगावर शहारे आणणारा खेळ पाहण्याची संधी मुंबईकर क्रीडाप्रेमींना लाभणार आहे. दिव्यांगांना प्रोत्साहन देण्यासाठी माजी कसोटीपटू अजित वाडेकर यांनी पुढाकार घेतला आहे. क्रिकेट खेळण्याचा अधिकार दिव्यांगानाही आहे आणि तो त्यांना आम्ही मिळवून देत असल्याचे एलआयसी करंडक दिव्यांग क्रिकेट स्पर्धेच्या पत्रकार परिषदे दरम्यान अजित वाडेकर म्हणाले. त्यासाठीच आठव्या आंतरविभागीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.


या स्पर्धेच्या निमित्ताने भारताच्या तब्बल २८ राज्यांमधून दिव्यांग क्रिकेटपटू मुंबईत येणार आहेत. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करणारे दिनेश सैन, दशरथ जामखंडी, सौरभ रवालिया, प्रणव राजळे आणि बलविंदर सिंगसारखे खेळाडूही खेळताना दिसतील.