एकीकडे साखरपुडा तर दुसरीकडे बाळाचा जन्म, पाकिस्तानच्या लाईव्ह मॅचमध्ये नेमकं काय घडलं?
PAK VS SA : पाकिस्तान - साऊथ आफ्रिकेदरम्यान झालेल्या सामन्यात असं काही घडलं ज्याची कोणीही अपेक्षा केली नव्हती.
PAK VS SA : पाकिस्तान विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या तीन वनडे सामन्यांची सीरिज पाकिस्तानने 3-0 ने आघाडी घेत जिंकली. जोहान्सबर्गमध्ये झालेल्या सीरिजच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा डकवर्थ लुईस नियमामुळे 36 धावांनी विजय झाला. सध्या पाकिस्तानचा संघ वनडे क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्मात असून त्यांनी साऊथ आफ्रिकेपूर्वी झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरिज जिंकल्या आहेत. पाकिस्तान - साऊथ आफ्रिकेदरम्यान झालेल्या सामन्यात असं काही घडलं ज्याची कोणीही अपेक्षा केली नव्हती.
'पिंक वनडे' ठरला खास :
जोहान्सबर्गमध्ये पाकिस्तान विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात झालेला तिसरा सामना हा 'पिंक वनडे' म्हणून साजरा केला गेला. यावेळी साऊथ आफ्रिकेचा संघ हा गुलाबी रंगाची जर्सी घालून खेळत होता. तसेच फॅन्स देखील गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये सामना पाहायला आले होते. यावेळी लाईव्ह सामन्यादरम्यान एक स्क्रीनवर अशी बातमी आली की ज्यामुळे सर्वच आश्चर्यचकित झाले. एका जोडप्याने स्टेडियममध्ये सामना सुरु असताना साखरपुडा केला तर दुसरीकडे एक जोडपं हे आई बाबा बनले. स्टेनियमवरील स्क्रीनवर लिहिलेला हा संदेश पाहून सर्व फॅन्स खुश झाले तर मैदानातील खेळाडूंनी देखील टाळ्या वाजवल्या.
जोडप्याने स्टेडियममध्ये केला साखरपुडा :
स्टेडियममध्ये प्रेयसीला प्रपोज करणं किंवा साखरपुडा करणं ही काही नवीन गोष्ट नाही. प्रेक्षकच नाही तर अनेक खेळाडूंनी सुद्धा आपल्या आवडत्या व्यक्तीला स्टेडियममध्ये खुलेआम प्रपोज केलं आहे. भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याने देखील आयपीएल सामन्यादरम्यान त्याची पत्नी जया भारद्वाज हिला प्रपोज केलं होतं. साऊथ आफ्रिकेच्या प्रेक्षकाने स्टेडियमवर सामना सुरु असताना त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं.
सामना सुरु असताना बाळाचा जन्म :
पाकिस्तान विरुद्ध साऊथ आफ्रिका सामना सुरु असताना स्टेडियम स्क्रीनवर एक बातमी आली की मिस्टर अँड मिसेस रबेंगला वांडरर्स स्टेडियमच्या मेडिकल सेंटरमध्ये मुलगा झाला आहे. यासाठी त्यांना शुभेच्छा. तर स्टेडियमवर प्रपोज केलेल्या कपलचा फोटो देखील स्क्रीनवर शेअर करण्यात आला. यावेळी त्यांना 'साखरपुडा झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तुमचे वैवाहिक जीवन चांगलं राहो आणि नातं आयुष्यभर टिकू दे' अशा शुभेच्छा देण्यात आल्या.