लोकेश राहुल लाजिरवाण्या रेकॉर्डपासून वाचण्यासाठी मैदानात उतरणार
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा इनिंग आणि २७२ रननी दणदणीत विजय झाला.
हैदराबाद : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा इनिंग आणि २७२ रननी दणदणीत विजय झाला. यानंतर आता या सीरिजची शेवटची टेस्ट १२ ऑक्टोबरपासून हैदराबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ओपनर लोकेश राहुल लाजिरवाण्या रेकॉर्डपासून वाचण्यासाठी मैदानात उतरणार आहे. २०१८ साली सुरुवातीला बॅटिंगला आल्यानंतर (पहिला ते तिसरा क्रमांकावर) शून्यवर आऊट होणाऱ्या बॅट्समनच्या यादीमध्ये दोन खेळाडू पहिल्या क्रमांकावर आहे. लोकेश राहुल आणि बांगलादेशचा मोमीनुल हक २०१८ साली ३ वेळा शून्यवर आऊट झाले.
आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळताना लोकेश राहुलनं खोऱ्यानं रन काढले पण टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र त्याला संघर्ष करावा लागला. लोकेश राहुल २०१८ साली १६ इनिंगमध्ये ३ वेळा शून्यवर, ६ वेळा एक अंकी रनवर आणि ८ वेळा १० किंवा त्यापेक्षा कमी स्कोअरवर आऊट झाला.
इंग्लंडविरुद्धच्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये राहुलनं २९९ रन केले, पण यातल्या १४९ रन या शेवटच्या टेस्टच्या शेवटच्या इनिंगमधल्या होत्या. यावर्षी सुरुवातीला बॅटिंग करणाऱ्या जगभरातल्या बॅट्समनमध्ये सर्वाधिक वेळा १० पेक्षा कमी रनवर आऊट होण्याचं रेकॉर्डही राहुलच्या नावावर आहे. राहुल १६ इनिंगपैकी ८ वेळा १० किंवा त्यापेक्षा कमी रनवर आऊट झाला. तर दक्षिण आफ्रिकेचा डीन एल्गार १८ इनिंगमध्ये ८ वेळा १० पेक्षा कमी रन करून आऊट झाला.