उत्तर पूर्व मुंबईमध्ये भाजप आणि ठाकरे गटात `सामना` मराठी वि. गुजराती लढतीचा रंग
Loksabha 2024 : उत्तर पूर्व मुंबईत भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगणार आहे. या लढतीला मराठी विरुद्ध गुजराती असा रंग दिला जातोय. नेमकी काय आहेत इथली राजकीय गणितं, पंचनामा उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचा.
अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : उत्तर पूर्व मुंबई... अर्थात ईशान्य मुंबई... लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर विठ्ठल उमप यांची ही कर्मभूमी. एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर दुसरीकडे खारफुटी जंगलाचा विस्तार. या दोघांच्या मध्ये वसलेला हा मतदारसंघ. भांडुप पंपिंग परिसरातील फ्लेमिंगो सेंचुरी ही पक्षी प्रेमींसाठी दरवर्षीची पर्वणी. फ्लेमिंगोसहित विविध प्रजातींचे दुर्मीळ पक्षी इथं निवाऱ्याला येतात. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी विहार तलाव आणि तुळशी तलाव याच मतदारसंघात आहेत.
ईशान्य मुंबईतील समस्या
या परिसरातल्या नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावं लागतं. नव्या इमारतींचे बांधकाम, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधा, झोपडपट्टीवासियांचे प्रश्न, एसआरए प्रकल्प, डम्पिंग ग्राउंड असे एक ना अनेक कळीचे मुद्दे आहेत.
धारावी प्रकल्पातील अनेकांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्याबाबतची चर्चा आहे. त्याला मुलुंडकरांचा विरोध आहे. उत्तर पूर्व मुंबईत गेल्या दोन निवडणुकांपासून भाजपचं कमळ फुलतंय.
ईशान्य मुंबईचं राजकीय गणित
2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी भाजपच्या किरीट सोमय्यांचा केवळ 2900 मतांनी पराभव केला. 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपच्या किरीट सोमय्यांनी पराभवाचा वचपा काढला. त्यांनी संजय पाटलांचा 3 लाख मतांनी पाडाव केला. 2019 मध्ये भाजपनं किरीट सोमय्यांचा पत्ता कापला आणि मनोज कोटक यांना रिंगणात उतरवलं. त्यांनी संजय पाटील यांना सव्वा दोन लाख मतांनी हरवलं. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 3, शिवसेना ठाकरे गटाचे 2 आणि सपाचा 1 आमदार आहे.
भाजपने मनोज कोटक यांचा पत्ता कापला
आता भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट केला आणि मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा (Mihit Kotecha) यांना उमेदवारी दिलीय. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राष्ट्रवादीतून पक्षात आलेले माजी खासदार संजय दिना पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आलीय.
मुलुंडपासून मानखुर्द-शिवाजीनगरपर्यंत परसरलेल्या उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात 7 लाखाहून अधिक मराठी मतदार आहे. त्याखालोखाल दोन ते सव्वा दोन लाख मुस्लीम मतदार आहे. जवळपास दोन लाख गुजराती मतदार, दीड लाख उत्तरभारतीय तसंच अन्य भाषिकांचा समावेश आहे. संजय पाटील आणि मिहीर कोटेचा यांच्यातील लढतीला मराठी विरुद्ध गुजराती असं स्वरूप दिलं जातंय..
धार्मिक आणि जातीय राजकारणाचा पगडा उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघावर आहे. इथून उमेदवार निवडून येतो त्याची किंवा आघाडीची सत्ता देशात येते असा आतापर्यंतचा ट्रेंड आहे. हा ट्रेंड यंदाही कायम राहणार का? यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणाराय.