पंजाबविरुद्धच्या सामन्याआधी केएल राहुलची चतूर खेळी, थेट न्यूझीलंडवरून मागवला `हा` स्टार खेळाडू!
Matt Henry replace David Willey : इंग्लंडचा ऑलराऊंडर डेव्हिड विली याने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर आता लखनऊ सुपर जायएन्ट्सने (Lucknow Super Giants) एका न्यूझीलंडच्या स्टार गोलंदाजाची संघात एन्ट्री केली आहे.
Lucknow Super Giants : इंग्लंडच्या अनेक खेळाडूंनी आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर आयपीएलकडे कानाडोळा केलाय. अशातच आता इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर डेव्हिड विलीनं (David Willey) आयपीएल 2024 मधून माघार घेतली आहे. लखनऊ सुपर जायंट्सनं डेव्हिड विलीला ऑक्शनमध्ये 2 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. मात्र, आता त्यानं वैयक्तिक कारण सांगून स्पर्धेतून आपलं नाव मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. डेव्हिड विलीने लखनऊला रामराम ठोकल्याने आता कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) अडचणीत सापडला आहे. मात्र, केएल राहुलने संधीचं सोनं करत थेट न्यूझीलंडच्या एका खेळाडूला संघात सामील करून घेतलंय.
डेव्हिड विलीच्या जागी लखनऊनं न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीचा (Matt Henry) संघात समावेश केल्याची माहिती आयपीएलच्या अधिकृत अकाऊंटवरून देण्यात आली आहे. लखनऊनं हेन्रीला 1.25 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत संघात सामील केलं आहे. लखनऊने एक पत्रक जाहीर करत याची घोषणा केली.
काय लिहिलंय पत्रात?
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीनं इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामासाठी लखनऊ सुपर जायंट्ससोबत करार केलाय. हेन्री इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विलीच्या जागी संघात आला, ज्यानं वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेतली होती. हेन्री 1.25 कोटींच्या मूळ किमतीत संघात सामील झाला आहे, असं आयपीएलच्या ॲडव्हायझरीमध्ये सांगण्यात आलंय.
कोण आहे मॅट हेन्री?
मॅट हेन्रीने आतापर्यंत 25 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 95 विकेट घेतल्या आहेत आणि 600 धावा केल्या आहेत. 82 एकदिवसीय सामन्यात 141 फलंदाजांना तंबूत पाठवलंय. तर त्याने 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडकडून 20 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळेच आता केएल राहुलने थेट मॅट हेन्रीला बोलवणं पाठवलं असून तो लवकरच लखनऊच्या संघात सामील होईल. मॅट हेन्रीने आतापर्यंत 2 आयपीएल सामने खेळले आहेत. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जच्या संघाचा भाग होता.