मुंबई : टीम इंडियाला श्रीलंका दौ-यावर गुरूवारी पहिल्यांदाच तगडी टक्कर मिळाली. टेस्ट सामन्यांमध्ये श्रीलंकेला मात दिल्यानंतर टीम इंडियाने पहिल्याच वन-डे सामन्यात श्रीलंकेला ज्या पद्धतीने हरविले, त्यानुसार असे वाटले होते की, श्रीलंकेची टीम बरीच मागे राहिल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, श्रीलंकेच्या टीमने दुस-या वन-डे सामन्यात दमदार प्रदर्शन करत टीम इंडियाच्या नाकी नऊ आणले होते. सुदैवाने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि भुवनेश्वर कुमार यांनी श्रीलंकेच्या हातातील विजय खेचून आणला.  


या रोमांचक सामन्यात एक वेळ अशीही आली होती की, त्यांना धोनीची विकेट मिळता मिळता राहिली आणि त्यांच्या चेह-यावरील हास्यच हरवले. या सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूंचा आनंद तेव्हा दु:खात बदलला जेव्हा ३५व्या ओव्हरमध्ये धोनीला नशीबाने साथ दिली. विश्वा फर्नांडो बॉलिंग करत होता. धोनीने त्याने फेकलेला बॉल हलक्या हाताने खेळला. मात्र बॉल धोनीच्या पॅडला लागून पायांच्या मधून स्टम्पकडे गेला.


धोनीला काही कळायच्या आत बॉल स्टम्पला जाऊन लागला. धोनी आऊट झाला म्हणून श्रीलंकेचे खेळाडू आनंदाने उड्या मारू लागले होते. मात्र, हा क्षणभरासाठी राहिला. कारण बॉल स्टम्पला लागला, पण बेल्स खाली पडल्या नाहीत. धोनी हळूच हसला. त्यावेळी त्याने २९ रन्स केले होते आणि टीम इंडियाला विजयासाठी ५९ रन्सची गरज होती.   



धोनी आऊट झाला असता तर कदाचित टीम इंडियाला विजय मिळू शकला नसता. त्याने नंतर संयमाने खेळत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला असून याचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.