धोनीचा दिलदारपणा; म्हणाला ऋषभ पंतला संधी द्या
एकदिवसीय सामन्यांसाठी धोनी अजूनही उपयुक्त खेळाडू असल्याचे निवड समितीचे मत आहे.
मुंबई: आगामी टी-२० विश्वचषकासाठी महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघात स्थान न दिल्यामुळे अनेक क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, हा निर्णय महेंद्रसिंह धोनीच्या सांगण्यावरूनच घेण्यात आल्याची माहिती आता पुढे आली आहे. धोनीने दिलदारपणा दाखवल्यामुळेच ऋषभ पंतला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळण्याची संधी मिळाली.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने याबद्दलचा खुलासा केला. धोनीला भारताच्या टी-२० संघातून का वगळण्यात आले, असा प्रश्न विराटला विचारण्यात आला. त्यावेळी विराटने म्हटले की, निवड समितीने याबद्दल अगोदर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे मी यावर अधिक बोलणे योग्य ठरणार नाही. मात्र, भविष्याचा विचार करुन धोनीनेच ऋषभ पंतला अधिक संधी मिळायला हवी, असे निवड समितीला सांगितले.
निवड समितीने संघ व्यवस्थापनामार्फत हा संदेश धोनीपर्यंत पोहोचवला होता. त्यानंतर धोनीकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
दरम्यान, टी-२० संघात धोनीला जागा नसली तरी एकदिवसीय सामन्यांसाठी धोनी अजूनही उपयुक्त खेळाडू असल्याचे निवड समितीचे मत आहे. सध्या त्याच्याकडून फारशा धावा होत नसल्या तरी निर्णायक सामन्यांमध्ये त्याच्या अनुभवाचा फायदा संघाला मिळू शकतो, असे निवड समितीचे मत आहे.