Khelratna Award : भाजपकडे आता एवढंच काम उरलं आहे- नाना पटोले
केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई : सध्या देशभरात टोकियो ऑल्मिपिकचे वारे वाहत आहेत. अशा उत्साहाच्या परिस्थिती केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या पुरस्काराचं नाव बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यानुसार आता राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसकडून टीका करण्यात येतेय.
खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर निशाणा साधलाय. नाना पटोले म्हणाले, केवळ नाव बदलणं हेचं भाजपं आणि नरेंद्र मोदींजवळ आहे. खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलल्यावरून भाजपने फक्त काँग्रेसच्या काळातील योजनांवर आपलं लेबल लावण्याचं काम केल्याची टीका केली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खलरत्न पुरस्काराचं नाव बदललं असल्याची घोषणा केली आहे. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, "संपूर्ण भारतातील नागरिकांनी खेळरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यायचंद ठेवण्याबाबत आग्रह धरला. तर यानंतर लोकांच्या भावनांचा आदर ठेवत खेळरत्न या पुरस्काराचं नाव मेजर ध्यायचंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आता खेळरत्न पुरस्काराला ध्यानचंद पुरस्काराने ओळखलं जाईल."
हा पुरस्कार 1991-1992 मध्ये सुरू करण्यात आला होता. त्यानंतर या पुरस्काराला देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं नाव देण्यात आलं. आतापर्यंत लिएंडर पेस, सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, पुलेला गोपिचंद, अभिनव बिंद्रा, अंजू बॉबी जॉर्ज, मेरी कोम तसंच राणी रामपाल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलंय.
कोण होते मेजर ध्यानचंद?
मेजर ध्यानचंद, यांना 'हॉकीचे जादूगार' म्हटलं जातं. त्यांनी सलग 3 वेळा ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. असं म्हणतात की, ज्यांनी त्याचे सामने पाहिले त्यांना वाटलं की त्याच्या हॉकीमध्ये एखादं मॅग्नेट आहे. म्हणूनच एकदा सामन्यादरम्यान, त्यांची हॉकी देखील तोडून पाहण्यात आली होती.