मुंबई : आयपीएलच्या ११व्या हंगामात मुंबईची हाराकिरी सुरुच आहे. मुंबईला मंगळवारी हैदराबादकडून पराभवाचा सामना करावा लागला. विजयासाठी कमी धावांचे लक्ष्य असतानाही मुंबईला हे आव्हान पूर्ण करता आले नाही. मुंबईला केवळ विजयासाठी ११९ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. मात्र मुंबईचा संपूर्ण डाव ८७ धावांवर आटोपला. यंदाच्या आयपीएलमधल्या ६ मॅचमध्ये मुंबईचा हा पाचवा पराभव आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी मुंबईचा रस्ता आणखी खडतर झाला आहे. ११९ रनचा पाठलाग करताना मुंबईला लागोपाठ धक्के बसत होते. हैदराबादच्या सिद्धार्थ कौलनं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर रशीद खान आणि बसील थंपीला प्रत्येकी २ विकेट मिळाल्या. संदीप शर्मा, मोहम्मद नबी आणि शकीब अल हसनला प्रत्येकी १ विकेट मिळाली. मुंबईकडून सूर्यकुमार यादवनं सर्वाधिक रन केल्या.


हार्दिकवर सर्वाधिक टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या या पराभवानंतर सगळ्यात जास्त टीका होत आहे ती हार्दिक पांड्यावर. हार्दिक पांड्यानं १७ बॉल खेळून फक्त ३ रन केल्या. मुंबईला २४ बॉलमध्ये ३९ रनची आवश्यकता असताना हार्दिक मैदानात होता. राशीद खानच्या या ओव्हरमध्ये हार्दिकनं एकही रन काढली नाही. ही ओव्हर मेडन गेल्यामुळे मुंबईला विजयासाठी १८ बॉलमध्यये ३९ रनची गरज होती. यानंतर सिद्धार्थ कौलच्या ओव्हरला जसप्रीत बुमराहनं एक रन काढून हार्दिकला बॅटिंग दिली. कौलच्या पुढच्या दोन्ही बॉलवर पांड्याला एकही रन काढता आली नाही. मग पुढच्या बॉलला हार्दिक साधारण शॉट मारून आऊट झाला.


प्रशिक्षक महेला जयवर्धने नाराज


टीमच्या या खराब कामगिरीमुळे प्रशिक्षक महेला जयवर्धने नाराज झाले आहे. बॅट्समननी जबाबदारी न घेतल्यामुळे मुंबईचा पराभव झाल्याचं जयवर्धने म्हणाला आहे. याआधीच्या मॅच मुंबई जवळ जाऊन हरली. टी-20मध्ये अशा मॅच जिंकण्याचीही संधी असते पण हैदराबादविरुद्धच्या मॅचमुळे मी निराश झाल्याचं जयवर्धनेनं बोलून दाखवलं.