VIDEO: धोनी म्हणतो; `मॅच फिक्सिंग हत्येपेक्षा मोठा अपराध`
मॅच फिक्सिंग हा हत्येपेक्षा मोठा अपराध असल्याचं वक्तव्य भारतीय टीमचा कर्णधार एमएस धोनीनं केलं आहे.
मुंबई : मॅच फिक्सिंग हा हत्येपेक्षा मोठा अपराध असल्याचं वक्तव्य भारतीय टीमचा कर्णधार एमएस धोनीनं केलं आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोन वर्षांचं निलंबन झाल्यानंतर मागच्या वर्षी आयपीएलमध्ये चेन्नईच्या टीमने पुनरागमन केलं. यावर आधारित 'रोर ऑफ द लायन' नावाची डॉक्युमेंट्री रिलीज होणार आहे. या डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. 'टीम यामध्ये (मॅच फिक्सिंग) शामिल होती. माझ्यावरही आरोप झाले. आमच्या सगळ्यांसाठी हा कठीण काळ होता. पुनरागमन करणं हा माझ्यासाठी भावूक क्षण होता. ज्या गोष्टीमुळे तुमचा मृत्यू होत नाही, ती तुम्हाला आणखी मजबूत बनवते, असं मी नेहमी म्हणतो', असं धोनी या ट्रेलरमध्ये म्हणाला आहे. २० मार्चपासून ही डॉक्युमेंट्री हॉटस्टारवर दाखवली जाणार आहे.
धोनीच्या नेतृत्वात २०१८ साली चेन्नईनं तिसऱ्यांदा आयपीएलची स्पर्धा जिंकली आणि आयपीएलमध्ये जोरदार पुनरागमन केलं. चेन्नईच्या टीमवर २०१३ सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे दोन वर्षांची बंदी घालण्यात आली.
एमएस धोनीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन वनडे मॅचसाठी आराम देण्यात आला आहे. यानंतर धोनी आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळेल. आयपीएल संपल्यानंतर भारत इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी रवाना होईल. ३० मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कप संपल्यानंतर धोनी निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध धोनी त्याच्या घरच्या मैदानात रांचीमध्ये तिसरी वनडे खेळला. यानंतरच्या दोन वनडेसाठी धोनीला आराम देण्यात आला. वर्ल्ड कपनंतर धोनीनं संन्यास घेतला, तर भारतात आणि त्याच्या घरच्या मैदानातही धोनीची ही शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच ठरली.