१०१ वर्षीय भारतीय धावपटूला चीनने नाकारला व्हिसा
वयाची शंभरी पार केलेल्या आणि भारतीय धावपटू असलेल्या मन कौर यांना चीनने व्हिसा नाकारला आहे. त्यामुळे मन कौर यांना आगामी स्पर्धेत भाग घेता येणार नाहीये.
नवी दिल्ली : वयाची शंभरी पार केलेल्या आणि भारतीय धावपटू असलेल्या मन कौर यांना चीनने व्हिसा नाकारला आहे. त्यामुळे मन कौर यांना आगामी स्पर्धेत भाग घेता येणार नाहीये.
चीनमध्ये २०वी आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा होत आहे. मात्र, या स्पर्धेत मन कौर यांना सहभागी होता येणार नाहीये. चंडीगडमधील १०१ वर्षांच्या मन कौर यांचा व्हिसा चीनने नाकारला आहे. व्हिसा नाकारण्यामागे कौर यांना स्पर्धेचे वैयक्तिक आमंत्रण नसल्याचे चीनने म्हटले आहे.
मन कौर यांनी यंदाच्या वर्षी ऑकलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड मास्टर्स स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवला होता. त्यानंतर आता मन कौर यांना २०व्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भाग घ्यायचा होता. मात्र, त्यांचा व्हिसा नाकारण्यात आला आहे.
मन कौर यांचा मुलगा गुरदेव सिंह यांनी सांगितले की, व्हिसा नाकारण्यामागे कौर यांना स्पर्धेचे वैयक्तिक आमंत्रण नसल्याचं कारण सांगण्यात आलं आहे. आम्ही व्हिसाच्या अर्जासोबत मास्टर्स अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचं पत्रही जोडलं होतं.
गुरदेव सिंह यांनी पूढे म्हटलं की, मन कौर यांना १०० मीटर धावण्यासह २०० मीटर धावणे, गोळाफेक आणि भालाफेक या स्पर्धांमध्येही सहभागी व्हायचं होतं.
या सर्व प्रकरणावर कौर यांनी म्हटलं की, व्हिसा नाकारण्यात आल्याने मला खूप दु:ख झालं आहे. या स्पर्धेसाठी मे गेल्या अनेक दिवसांपासून सराव करत आहे. व्हिसा नाकारला जाणं ही माझ्यासाठी धक्कादायक बाब आहे. मी माझ्या मुलासोबत अनेक देशांत विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे मात्र, अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे.