मुंबई : टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू अभिनेत्रीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मनिष पांडे हा दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीसोबत लग्न करणार आहे. २ डिसेंबरला या दोघांचं लग्न होणार आहे. मनिष पांडे हा सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटकच्या टीमचं नेतृत्व करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२६ वर्षांच्या अश्रिताने इंद्रजीत, ओरु कन्नयम मुनू कलावानिकलम, उदयम एनएच ४ यासारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. २०१२ साली रिलीज झालेल्या तेलीकेडा बोली या चित्रपटातून अश्रिता शेट्टीने या क्षेत्रात पदार्पण केलं होतं. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार मनिष पांडे त्याच्या लग्नाला जवळचे मित्र आणि नातेवाईकांनाच बोलावणार आहे. संपूर्ण रिती रिवाजानुसार हे लग्न २ दिवस चालणार आहे.


मनिष पांडे-अश्रिता शेट्टीआधी विराट कोहली-अनुष्का शर्मा, युवराज सिंग-हेजल कीच, झहीर खान-सागरिका घाटगे, हरभजन सिंग-गीता बसरा, मोहम्मद अजहरुद्दीन-संगीता बिजलानी या क्रिकेटपटू-अभिनेत्रीच्या जोड्यांनी लग्न केलं.


२०१५ साली झिम्बाब्वेविरुद्ध मनिष पांडेने त्याची पहिली मॅच खेळली. मनिषने आत्तापर्यंत २३ वनडे मॅच खेळल्या आहेत. यातल्या १८ इनिंगमध्ये त्याने ३६.६६ च्या सरासरीने आणि ९१.८५ च्या स्ट्राईक रेटने ४४० रन केले आहेत. मनिष पांडेच्या नावावर १ शतक आणि २ अर्धशतकही आहेत. तर ३१ टी-२० मॅचच्या २६ इनिंगमध्ये मनिष पांडेने ३७.६६ च्या सरासरीने आणि १२१.५० च्या स्ट्राईक रेटने ५६५ रन केले आहेत. यातल्या ११ वेळा मनिष पांडे नाबाद राहिला आणि त्याने १ अर्धशतकं केली आहेत.


२०१६ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सीबी सीरिजच्या शेवटच्या मॅचमध्ये मनिष पांडेने ८१ बॉलमध्ये नाबाद १०४ रन करुन भारताला विजय मिळवून दिला होता. मनिष पांडेचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं हे एकमेव शतक आहे. यानंतरही त्याला संधी मिळाली, पण या संधीचा त्याला फायदा उचलता आला नाही. पण भारत ए कडून खेळताना खेळाडू आणि कर्णधार म्हणून मनिष पांडेची कामगिरी चांगली राहिली.


मनिष पांडे आयपीएलमध्ये शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. २००९ साली बंगळुरूकडून खेळताना हैदराबादविरुद्ध मनिष पांडेने नाबाद ११४ रनची खेळी केली होती. यानंतर मनिष पांडे पुणे आणि कोलकात्याकडूनही खेळला. २०१८ साली हैदराबादने मनिष पांडेला ११ कोटी रुपयांना विकत घेतलं, यामुळे मनिष पांडे हैदराबाद टीमचा सगळ्यात महागडा खेळाडू झाला. २०१९ साली हैदराबादने मनिष पांडेला टीममध्ये कायम ठेवले.