`आयपीएल लिलावातून मिळालेले पैसे आईच्या आजारावर खर्च करणार`
६० रुपये रोजंदारीवर काम करणाऱ्या खेळाडूला किंग्ज इलेव्हन पंजाबनं २० लाख रुपयांना विकत घेतलं आहे.
मुंबई : ६० रुपये रोजंदारीवर काम करणाऱ्या खेळाडूला किंग्ज इलेव्हन पंजाबनं २० लाख रुपयांना विकत घेतलं आहे. मंजूर डार असं या खेळाडूचं नाव आहे. जम्मू काश्मीरचा असलेला मंजूर लांब सिक्स मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. किंग्ज इलेव्हन आणि प्रिती झिंटाला मला धन्यवाद द्यायचे आहेत. माझ्यावर बोली लागली तेव्हा मला गावचे दिवस आठवले. तेव्हा गावामध्ये मी ६० रुपये रोजंदारीवर काम करत होतो, असं मंजूर डार म्हणालाय.
क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी रात्री सुरक्षा रक्षकाची नोकरी करायचो आणि सकाळी क्रिकेट खेळायचो. सुरक्षा रक्षकाची नोकरी करत असतानाच मी क्लब क्रिकेट खेळायला सुरुवात केली, असं मंजूर दारनं सांगितलं. २००८-२०१२मध्ये मंजूर डारनं सुरक्षा रक्षकाची नोकरी केली होती. क्लब क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे बूट आणि क्रिकेटचं साहित्य नव्हतं, असं वक्तव्य डारनं केलंय. आयपीएलमध्ये करारबद्ध झालेला मंजूर डार हा जम्मू-काश्मीरचा एकमेव खेळाडू आहे.
क्रिकेटमध्ये २० लाख रुपये जास्त रक्कम नसली तरी माझ्यासाठी ही रक्कम मोठी आहे. यातून माझ्या आईच्या आजारपणावर इलाज होईल. तसंच मागच्या ३-४ वर्षांपासून घर बांधायचं माझं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होईल, असं डार म्हणाला.