Match-Fixing Returns in T20 World Cup 2024: अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सध्या टी-20 वर्ल्डकप खेळला जात आहे. यादरम्यान मॅच फिक्सिंगचं एक प्रकरण समोर आलं आहे. युंगाडाच्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) यासंबंधी तक्रार केली आहे. आपल्याला अज्ञात क्रमांकावरुन वारंवार फोन आल्याचं त्याने आयसीसीला सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीकडून मॅच फिक्सिंग होऊ नये यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. मॅच फिक्सिंग आयसीसीसाठी मोठी डोकेदुखी आहे. त्यातच आता टी-20 वर्ल्डकपमध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न झाल्याचा खुलासा झाला आहे. केनियाच्या एका माजी खेळाडूने युगांडाच्या खेळाडूला वेगवेगळ्या क्रमांकावरुन फोन करुन फिक्सिंगची ऑफर दिली. आयसीसीने तात्काळ याची दखल घेत प्रकरण मिटवलं आहे.  


पीटीआयच्या माहितीनुसार, गयानामध्ये वर्ल्डकपच्या लीग स्टेज सामन्यांदरम्यान हा प्रकार घडला आहे. केनियाच्या एका माजी जलदगती गोलंदाजाने वेगवेगळ्या क्रमाकांवरुन युगांडाच संघाच्या सदस्याशी सतत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. यानंतर युगांडाच्या खेळाडूने आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी प्रोटोकॉलचं पालन करत तिथे उपस्थित आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी यावर तात्काळ कारवाई करत सर्व संघांना केनियाच्या या खेळाडूपासून सावध राहण्यास सांगितलं आहे. 


मोठ्या संघांच्या तुलनेत छोट्या देशांना टार्गेट करणं सोपं


एका सूत्राने पीटीआयला सांगितलं आहे की, "त्या खेळाडूने युगांडाच्या राष्ट्रीय संघातील सदस्याला टार्गेट केलं याच्यात आश्चर्याची काही बाब नाही. मोठ्या संघांच्या तुलनेत छोटे संघांना जाळ्यात ओढणं सोपं असतं. पण खेळाडूने आयसीसीला लगेच माहिती देत चांगलं काम केलं आहे".


भ्रष्टाचारासाठी ऑफर मिळाल्याची तक्रार न करणं हा आयसीसी लाचलुचपत प्रतिबंधक संहितेअंतर्गत गुन्हा आहे. इतर गुन्ह्यांमध्ये मॅच फिक्सिंग, खेळावरील सट्टेबाजी, आंतरिक माहितीचा समावेश आहे.


युगांडाने पापुआ न्यू गिनीचा पराभव करत आपल्या वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात केली होी. पण यानंतर अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज संघाकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 


2011 वर्ल्डकपमध्येही सट्टेबाजांनी साधला होता संपर्क


सूत्रांच्या माहितीनुसार, खासकरुन छोट्या देशाच्या क्रिकेटर्सशी संपर्क साधला जातो. टी-20 वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये यासाठी अधिक काळजी घेतली जाते. जर एखाद्याने काही ऑफर दिली तर तात्काळ आयसीसी एसीयूला याची माहिती दिली जाते. यानंतर प्रोटोकॉलनुसार योग्य कारवाई केली जाते. 


याआधी भारतात 2011 मध्ये खेळण्यात आलेल्या वर्ल्डकपदरम्यान कथित सट्टेबाजांनी कॅनडाचा विकेटकिपर हमजा तारीफशी संपर्क साधळा होता. यानंतर खेळाडूने तात्काळ आयसीसीला याची माहिती दिली होती.