रेकॉर्डब्रेक कामगिरी करणारा हा खेळाडू अजूनही टीमबाहेर, विराट कधी देणार संधी?
श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिजसाठी भारतानं नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
मुंबई : श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिजसाठी भारतानं नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खोऱ्यानं रन्स करणाऱ्या मयंक अग्रवालला या टीममध्ये स्थान देण्यात आलं नाही. मयंक अग्रवालला वगळल्यामुळे अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं आहे. २७ वर्षांच्या मयंकनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक रन्स बनवण्याचा रेकॉर्ड केला आहे.
सचिन-विराटलाही टाकलं मागे
मयंकनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक ७०५ रन्स बनवल्या आहेत. एवढ्या रन्स करुन मयंकनं सचिन तेंडुलकर, विराट कोहली, दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा यांना मागे टाकलं आहे. याचबरोबर मयंक कोणत्याही इंटर स्टेट ए लिस्ट स्पर्धेमध्ये ७०० रन्स बनवणारा पहिला खेळाडू बनला आहे. सचिन तेंडुलकरनं २००३ वर्ल्ड कपमध्ये ६७३ रन्स केल्या होत्या.
रणजीमध्येही शानदार कामगिरी
रणजीमध्येही मयंकनं १०५.४५ च्या सरासरीनं ५ शतकं आणि ११६० रन्स केल्या आहेत. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेमध्ये मयंकनं १४५च्या स्ट्राईक रेटनं २५८ रन्स केल्या. तर ५० ओव्हरच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मयंकनं ३ शतकांसोबत ७०० रन्स केल्या आहेत.
आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळणार मयंक
आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये मयंक किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणार आहे. २० लाख रुपयांची बेस प्राईज असलेल्या मयंकला पंजाबनं १ कोटी रुपयांना विकत घेतलं.
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी
मयंकनं आत्तापर्यंत ३७ प्रथम श्रेणी मॅचच्या ६३ इनिंगमध्ये ५१.१७ची सरासरी आणि ५९.७०च्या स्ट्राईक रेटनं २,९१७ रन्स केल्या आहेत. ३०४ रन्सच्या सर्वाधिक स्कोअरसह मयंकनं ७ शतकं आणि १६ अर्धशतकं केली आहेत.
तर लिस्ट एच्या ५३ मॅचच्या ५३ इनिंगमध्ये मयंकनं ९८.७८ च्या स्ट्राईक रेट आणि ४७,३९च्या सरासरीनं २,५१२ रन्स केल्या आहेत. यामध्ये ८ शतकं आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. १०० टी-20 मॅचच्या ९५ इनिंगमध्ये मयंकनं १३०.९७ चा स्ट्राईक रेट आणि २४.६६ च्या सरासरीनं २२२० रन्स केल्या आहेत.
मयंकचं आयपीएलमधलं रेकॉर्ड
आयपीएलमध्ये मयंक दिल्ली डेअरडेव्हिल्स, रायजिंग पुणे सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरूकडून खेळला आहे. आयपीएलच्या ५३ मॅचच्या ४८ इनिंगमध्ये मयंकनं १२३.९४ चा स्ट्राईक रेट आणि १७.७८ च्या सरासरीनं ८१८ रन्स केल्या आहेत. आयपीएलमध्ये मयंकनं ३ अर्धशतकं केली आहेत. मयंक २०१० सालच्या अंडर १९ वर्ल्ड कप टीमचाही सदस्य होता. अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये मयंकनं भारताकडून सर्वाधिक रन्स केल्या होत्या.