`कचरा` म्हणणाऱ्या खेळाडूची भारतीय बॉलरनी बोलती बंद केली
पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमनं जोरदार पुनरागमन केलं आहे.
नॉटिंगहम : पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमनं जोरदार पुनरागमन केलं आहे. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या शानदार बॅटिंगमुळे भारतानं पहिल्या इनिंगमध्ये ३२९ रन केले. यानंतर भारतीय बॉलिंगसमोर इंग्लंडच्या बॅट्समननी लोटांगण घातलं. हार्दिक पांड्याच्या वादळी स्पेलमुळे इंग्लंडची टीम १६१ रनवर ऑल आऊट झाली. हार्दिक पांड्यानं ६ ओव्हरमध्ये २८ रन देऊन इंग्लंडच्या ५ विकेट घेतल्या. तर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. मोहम्मद शमीला एक विकेट घेण्यात यश आलं.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारतानं ३०७-६ अशी केली होती. पण ३२९ रनवर भारताची टीम ऑल आऊट झाली. यानंतर बॅटिंगला आलेल्या इंग्लंडनं चांगली सुरुवात केली. ओपनिंगला आलेल्या एलिस्टर कूक आणि केटन जेनिंग्सनं इंग्लंडला ५४ रनची सुरुवात करून दिली.
११ ओव्हरमध्येच इंग्लंडच्या टीमनं हा पल्ला गाठल्यामुळे इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉननं भारतीय बॉलरवर टीका केली. भारतीय बॉलर कचऱ्यासारखी बॉलिंग करतायत असं ट्विट वॉनननं केलं होतं. बॉलरसाठी चांगला दिवस, जर तुम्ही चांगली बॉलिंग कराल तर... भारतीय बॉलर कचरा बॉलिंग करत आहेत, असं वॉननं ट्विटरवर म्हणाला.
पण थोड्याच वेळामध्ये भारतीय बॉलरनी उल्लेखनीय कामगिरी करत मायकल वॉनची बोलती बंद केली. यानंतर वॉननं ट्विट करत भारतीय बॉलिंगचं कौतुक केलं. लंचनंतर कचऱ्यासारखी बॉलिंग केली नाही. जबरदस्त कामगिरी, असं ट्विट वॉननं केलं.