`IPL मधला पैसा नाही तर देशासाठी खेळणं महत्त्वाचं`; चॅम्पियन संघातील खेळाडूचं विधान
Playing Test More Important Than IPL: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना जिंकल्यानंतर या खेळाडूने आयपीएलचा उल्लेख करत केलेलं विधान हे भारतीय क्रिकेटपटूंच्या डोळ्यामध्ये अंजन घालणार आहे. या विधानावरुन अनेकांनी या खेळाडूचं कौतुक केलं आहे.
Playing Test for Australia More Important Than IPL: रविवारी (11 जून 2023 रोजी) ऑस्ट्रेलियन संघाने भारताला 209 धावांनी पराभूत करुन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर नाव कोरलं. या विजयामध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनेही मोलाचं योगदान दिलं. मिचेल स्टार्कने दोन्ही डावांमध्ये मिळून भारताच्या 4 गड्यांना तंबूत पाठवलं. जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असलेला मिचेल स्टार्क यंदाच्या इंडियन प्रिमिअर लिगमध्ये खेळताना दिसला आहे. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर बोलताना मिचेल स्टार्कने आपण आयपीएलमध्ये खेळण्याऐवजी देशासाठी खेळण्यास प्राधान्य देतो असं स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं.
तो इतर स्पर्धांमध्ये खेळत नाही
मला ऑस्ट्रेलियाकडून खेळताना सर्वोच्च कामगिरी करायची आहे असं मिचेल म्हणाला. मिचेल हा डावखुरा गोलंदाज असून आपलं प्राधान्य आयपीएलऐवजी राष्ट्रीय संघ असल्याचंही तो म्हणाला. भविष्यात ऑस्ट्रेलियातील तरुण खेळाडूही याच विचाराने खेळतील असंही मिचेल म्हणाला. मिचेलसोबत यंदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळलेले ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू हे आयपीएलबरोबर, बिग बॅश आणि इतर टी-20 लिग स्पर्धाही खेळतात. मात्र स्टार्क या स्पर्धांमध्ये खेळत नाही. स्टार्कची पत्नी एलीसा हिली ही महिला आयपीएलच्या पहिल्या पर्वात खेळली.
पैसा येत जात राहतो पण...
मिचेल स्टार्कने 'द गार्डियन'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मला आयपीएल स्पर्धा फार आवडली. तसेच मला यॉर्कशायरसाठी काउंटी क्रिकेट खेळतानाही फार समाधान मिळालं. मात्र ऑस्ट्रेलियासाठी खेळण्यास मी प्रथम प्राधान्य देतो. यासाठी मला इतर स्पर्धा खेळता येत नाहीत याचं काही विशेष वाईट वाटत नाही, असंही स्टार्कने म्हटलं. आयपीएलचा उल्लेख करताना त्याने, "पैसा येत जात राहणार. मात्र देशाचं प्रतिनिधित्व करण्याची मला जी संधी मिळाली आहे त्यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो," असंही म्हटलं.
भारतीय खेळाडूंवर आयपीएलमुळे तणाव?
कसोटी क्रिकेट हे 100 वर्षांहून अधिक काळापासून खेळलं जात आहे अशी आठवण मिचेल स्टार्कने करुन दिली. ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची संख्या 500 हून कमी आहे. त्यामुळे या 500 लोकांपैकी मी एक आहे हे फार खास आहे. मिचेल स्टार्कने केलेल्या या विधानाचं भारतीय क्रिकेट चाहत्यांनी कौतुक केलं आहे. अशाप्रकारे देशासाठी खेळण्याची मनापासून इच्छा असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम खेळावर होतो असं अनेकांनी म्हटलं आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या अगदी 10 दिवस आधीपर्यंत आयपीएल खेळत होते. पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही आयपीएलमुळे सरावासाठी खेळाडूंना पुरेसा वेळ मिळाला नाही अशा अर्थाचं विधान केलं.