ICC ने मितालीला विचारले, कोणत्या सट्टेबाजाने तुझ्याशी संपर्क केला होता का?
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला आयसीसीच्या बैठकीदरम्यान तिला कोणत्या सट्टेबाजांनी संपर्क केला होता का असा सवाल करण्यात आला.
कोलकाता : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला आयसीसीच्या बैठकीदरम्यान तिला कोणत्या सट्टेबाजांनी संपर्क केला होता का असा सवाल करण्यात आला. मितालीला या बैठकीत विशेष आमंत्रित करण्यात आले होते. बैठकीत महिला क्रिकेटवरही चर्चा करण्यात आली. आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मिताली काही वेळासाठी बैठकीत होती. यावेळी तिला मॅच फिक्सिंगसाछी कोणी संपर्क केला होता का असा प्रश्न विचारला असता तीने नाही असे उत्तर दिले.
अंडर १९ आणि महिला क्रिकेट संघाच्या आधिकाधिक सामन्यांचे प्रसारण होत असताना आयसीसी ऐतिहासिक पाऊल उचलतेय. मितालीने याबाबत बोलताना म्हटले, महिला क्रिकेटमध्ये अमूलाग्र बदल होतो. मी जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा कोणी मला ओळखत नव्हते. मात्र आता प्रत्येकजण मला ओळखतंय. महिला क्रिकेटसाठी हा टर्निंग पॉईंट आहे. वर्ल्डकपमध्ये जे झाले आणि लोक आता ज्याप्रमाणे महिला क्रिकेटला महत्त्व देतायत महिला क्रिकेटसाठी ही चांगली सुरुवात आहे.
मिताली म्हणाली, आता क्रिकेटवरील चर्चा केवळ पुरुषांपुरती सीमित राहिलेली नाहीये. सामान्य माणूसही क्रिकेट पाहतो आणि त्यातील आनंद कायम राखला पाहिजे.
३५ वर्षीय मिताली राजने पहिली वनडे २६ जून १९९९मध्ये खेळली होती. तिने १९४ वनडेत १७५ डावांत ५०.१८च्या सरासरीने ६३७३ धावा केल्यात. यात ६ शतके आणि ५० अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20मध्ये मितालीने ७२ सामने खेळताना ६९ डावांत १९७७ धावा केल्या.