लखनऊ : क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता मोहम्मद कैफ यानं राजकारणातूनही संन्यास घेतला आहे. ३७ वर्षांचा मोहम्मद कैफ २०१४ साली काँग्रेस पक्षात गेला होता. उत्तर प्रदेशच्या फूलपूरमधून कैफनं लोकसभा निवडणूक लढली होती. उत्तर प्रदेशचे सध्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याविरुद्ध कैफ निवडणूक लढला होता. पण या निवडणुकीत कैफ याचा पराभव झाला होता. या निवडणुकीत ५८ हजार मतं मिळालेला कैफ चौथ्या स्थानावर होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता क्रिकेट भरपूर झालं. मी कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छितो. मी भारतीय टीममध्ये नव्हतो पण छत्तीसगडकडून रणजी खेळत असल्यामुळे वर्षातले पाच ते सहा महिने बाहेर असायचो. कुटुंबाला वेळही देता यायचा नाही. माझी मुलं छोटी आहेत आणि त्यांना माझी गरज आहे, असं कैफ म्हणाला. एकदा निवडणूक लढलो एवढंच बास आहे, अशी प्रतिक्रिया कैफनं दिली. आता उत्तर प्रदेशमधल्या युवा खेळाडूंसाठी काहीतरी करायचं आहे अशी इच्छा कैफनं व्यक्त केली आहे.


मोहम्मद कैफनं भारताकडून १३ टेस्ट मॅच आणि १२५ वनडे खेळल्या. आयपीएलमध्ये कैफ राजस्थान, पंजाब आणि बंगळुरूच्या टीममध्ये होता. सध्या कैफ कॉमेंट्री करत आहे.