खेळाडूंची जात काढणाऱ्यांना मोहम्मद कैफनं सुनावलं
भारताकडून क्रिकेट खेळलेल्या अनुसुचित जाती आणि जमातीच्या खेळाडूंबाबत वृत्त प्रसिद्ध केलेल्या एका इंग्रजी वेबसाईटला मोहम्मद कैफनं खडे बोल सुनावले आहेत.
मुंबई : भारताकडून क्रिकेट खेळलेल्या अनुसुचित जाती आणि जमातीच्या खेळाडूंबाबत वृत्त प्रसिद्ध केलेल्या एका इंग्रजी वेबसाईटला मोहम्मद कैफनं खडे बोल सुनावले आहेत. प्राईम टाईममध्ये काम करणारे किती पत्रकार एससी आणि एसटी आहेत? तुमच्या संस्थेमध्ये काम करणारे संपादकीय पदावरचे किती वरिष्ठ एससी एसटी आहेत? खेळानंच जातीच्या भिंती तोडल्या आहेत. खेळाडू सर्वसमावेषक होऊन खेळतात. पण अशाप्रकारच्या पत्रकारितेमुळे समाजात तेढ निर्माण होते असं ट्विट मोहम्मद कैफनं केलं.
भारतानं टेस्ट क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यानंतर २९० पैकी ४ अनुसुचित जाती आणि जमातीचे खेळाडू भारताकडून खेळले. भारताच्या लोकसंख्येनुसार असे ७० खेळाडू भारताकडून खेळले पाहिजे होते, असं या वृत्तात मांडण्यात आलं आहे. भारताच्या ४ दलित खेळाडूंपैकी ३ खेळाडू फास्ट बॉलर ऑल राऊंडर होते. तर या शतकामध्ये ८ पैकी ५ मुस्लिम खेळाडू फास्ट बॉलर होते. आयपीएलमध्ये २७ मुस्लिम बॉलर होते तर ८ ऑल राऊंडर होते आणि ८ बॅट्समन असल्याचे आकडे या वृत्तामध्ये देण्यात आले होते.
या वृत्तामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये देण्यात येणाऱ्या आरक्षणावरही भाष्य करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये कमीतकमी ६ कृष्णवर्णीयांना टीममध्ये स्थान देण्यात येत असल्याचं या वृत्तात सांगण्यात आलं.