`मुस्लिमांना बदनाम करु नकोस`, मोहम्मद कैफ ट्रोलर्सच्या निशाण्यावर
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफला पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्याचा सामना करावा लागला आहे.
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफला पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्याचा सामना करावा लागला आहे. मोहम्मद कैफने सचिन तेंडुलकरसोबतचा एक फोटो शेयर केला. या फोटोमध्ये कैफ सचिनला कृष्ण आणि स्वत:ला सुदामा म्हणाला, यानंतर ट्विटरवर काही यूजर्सनी मोहम्मद कैफवर टीका केली.
'तुझं नाव बदल, मुस्लिमांना बदनाम करु नकोस. कैफला लाज वाटली पाहिजे. मुस्लिम आहेस, तर असं काही करण्याआधी विचार करायला पाहिजे होतास. सगळ्यांना आनंदी ठेवण्यासाठी आणि कॉमेंट्री करुन पैसे कमवण्यासाठी तू तुझा इमान विकलास' अशा प्रतिक्रिया कैफच्या या फोटोवर आल्या आहेत.
मोहम्मद कैफने जुलै २०१८ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारताचा सर्वोत्तम फिल्डर म्हणून कैफचं नाव नेहमीच घेतलं जातं. १३ जुलै २००२ साली नॅटवेस्ट ट्रॉफी फायनलच्या ऐतिहासिक विजयात कैफने महत्त्वाची भूमिका निभावली होती. कैफच्या नावावर १२५ वनडेमध्ये २,७५३ रन आहेत, तर १३ टेस्ट इनिंगमध्ये कैफने ३२४ रन केले आहेत, यामध्ये एका शतकाचा समावेश आहे.