मुंबई : भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी हा मुस्लिम धर्मांधांच्या निशाण्यावर आला आहे. मोहम्मद शमीने वसंत पंचमीच्या निमित्त त्याच्या मुलीचा सरस्वती पुजनाचा एक फोटो शेयर केला. या फोटोमध्ये मोहम्मद शमीची मुलगी आयराने साडी नेसली आहे. पण हा फोटो शेयर केल्यामुळे मोहम्मद शमीवर धर्मांधांनी टीका केली. 'खूप चांगली दिसत आहेस. देव तुझं भलं करो. लवकरच भेटू,' अशी कॅप्शन मोहम्मद शमीने या फोटोला दिली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तू नावामध्ये मोहम्मद लावू नकोस ही विनंती. तू मुसलमान असल्यामुळे पूजा करु नकोस' अशा वेगवेगळ्या कमेंट शमीच्या फोटोवर करण्यात आल्या आहेत. शमीने टाकलेल्या या फोटोंचं अनेकांनी कौतुकही केलं आहे. तसंच शमी हा खरा हिंदुस्तानी असल्याच्या प्रतिक्रियाही या फोटोवर देण्यात आल्या आहेत.






मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहांने घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. शमीसोबत वाद असल्यामुळे त्याची पत्नी हसीन जहां ही तिच्या माहेरी मुलीसोबत राहत आहे. त्यामुळे मोहम्मद शमीला त्याची एकुलती एक मुलगी आयराला भेटता येत नाही. आयराची भेट होत नसल्याची खंत शमीने अनेकवेळा बोलून दाखवली आहे.


मोहम्मद शमी हा गेल्या वर्षभरात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये मोहम्मद शमीने भेदक बॉलिंग करत भारताला सुपर ओव्हरमध्ये नेलं. या सुपर ओव्हरमध्ये भारताचा रोमांचक विजय झाला. मागच्यावर्षी वर्ल्ड कपमध्येही शमीने अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्रिक घेतली. टेस्टमध्ये टीममध्ये स्वत:चं स्थान पक्कं केलेल्या मोहम्मद शमीने वनडे आणि टी-२० टीममध्ये शानदार पुनरागमन केलं. आता शमी टेस्ट बरोबरच वनडे आणि टी-२० टीमचाही महत्त्वाचा हिस्सा आहे.