IND vs AFG: अखेरच्या षटकातील धोनीच्या `त्या` सल्ल्यामुळेच सामना फिरला
भारत हा सामना हरणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
लंडन: विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात शनिवारी झालेल्या सामन्यात मोहम्मद शामीने अखेरच्या षटकात आपल्या संघासाठी विजय खेचून आणला होता. अखेरच्या षटकांत अफगाणिस्तानला विजयासाठी १६ धावांची गरज होती. शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने चौकार मारल्यामुळे भारत हा सामना हरणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
यावेळी पुन्हा एकदा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी भारताच्या मदतीला धावून आला. यावेळी धोनीने धावत मोहम्मद शामीजवळ येत त्याच्याशी काहीवेळी चर्चा केली. धोनीने शामीला यॉर्कर चेंडू टाकत राहण्यास सांगितले. काहीही झाले तरी तुझी रणनीती बदलू नकोस, असे धोनीने शामीला सांगितले. यानंतर शामीने पुढचा चेंडू निर्धाव टाकला. त्यामुळे मोहम्मद नबीवरील दबाव वाढला आणि पुढच्याच चेंडूवर तो मोठा फटका खेळायला गेला. हा चेंडू सीमारेषेवर उभ्या असलेल्या हार्दिक पांडयाने सहजपणे पकडला. यानंतर शामीने अफताब आलम आणि मुजीब उर रेहमानला त्रिफळाचीत करत यंदाच्या विश्वचषकातील पहिली हॅटट्रिक नोंदवली.
या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही शामीला याविषयी विचारण्यात आले. यावेळी शामीने म्हटले की, रणनीती स्पष्ट होती की, यॉर्कर चेंडू टाकायचे आहेत. माही भाईनेही मला हाच सल्ला दिला की, आता रणनीतीमध्ये काहीच बदल करू नको. तुझ्याकडे हॅटट्रिक घेण्याचा चांगला चान्स आहे. त्यासाठी प्रयत्न कर. यानंतर मी धोनीने सांगितल्याप्रमाणे गोष्टी केल्या, असे शामीने सांगितले.
मोहम्मद शामी विश्वचषकात हॅटट्रिक करणाऱा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. १९८७ साली भारताचे माजी गोलंदाज चेतन शर्मा यांनी अशी कामगिरी केली होती. शमीने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ९.५ षटकांत १ षटक निर्धाव टाकत ४० धावा देऊन ४ बळी घेतले.