मुंबई : भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. हसीन जहांनं मोहम्मद शमीवर मारपीट, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केले आहेत. मोहम्मद शमीच्या पत्नीनं त्याच्याविरोधात केसही दाखल केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हसीन जहां एवढे आरोप करत असली तरी मोहम्मद शमीनं हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मुलीसाठी हा वाद संपवण्याची इच्छाही शमीनं व्यक्त केली होती. पण हसीन जहांकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नसल्यामुळे मोहम्मद शमीनंही हसनीवर आरोप करायला सुरुवात केली आहे.


या आरोप-प्रत्यारोपांमध्ये हसीन जहांनं पुन्हा एकदा शमीवर निशाणा साधला आहे. शमीचे जानेवारी महिन्यापासून अलिश्बाशी संबंध आहेत. शमीनं सेलिब्रिटी असल्याचा फायदा उचलून अलिश्बाच नाही तर इतर मुलींचं आयुष्यही बरबाद केलं आहे, असा आरोप हसीन जहांनं केला आहे. तसंच मोहम्मद शमीला भर रस्त्यात फटकवलं पाहिजे, असंही हसीन जहां म्हणाली आहे.


दोन दिवस दुबईत होता मोहम्मद शमी


हसीन जहांच्या या आरोपानंतर बीसीसीआयचं भ्रष्टाचारविरोधी पथक आणि कोलकाता पोलिसांनी मोहम्मद शमीची चौकशी केली. या चौकशीनंतर बीसीसीआयनं कोलकाता पोलिसांना रिपोर्ट दिला आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत शमी कुठे होता, याबाबतची माहिती बीसीसीआयनं पोलिसांना दिली आहे.


मोहम्मद शमी १७ आणि १८ फेब्रुवारीला दुबईत होता असं बीसीसीआयनं पोलिसांना सांगितलं. शमी दोन दिवस दुबईमध्ये काय करत होता याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. हे शमीचं वैयक्तिक आयुष्य आहे, असं बीसीसीआयनं सांगितलं आहे.


२३ मार्चला हसीन जहां ममता बॅनर्जींना भेटणार


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी हसीन जहांला भेटायची तयारी दाखवली आहे. मागच्या काही दिवसांपासून हसीन ममतांना भेटण्याचा प्रयत्न करत होती. आता २३ मार्चला या दोघींची भेट होणार असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.