`क्रिकेटला एक जोक....`, पाकिस्तानी खेळाडूच्या `त्या` टीकेवर मोहम्मद शमीने अखेर मौन सोडलं, `मत्सरतेपोटी...`
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर हसन रझा (Hasan Raza) याने एकदिवसीय वर्ल्डकपदरम्यान (Cricket World Cup 2023) भारतीय गोलंदाजांबद्दल अजब दावा केला होता. यावरुन बराच वाद झाला होता. दरम्यान, मोहम्मद शमीनेही (Mohammed Shami) त्याला उत्तर दिलं आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami)पाकिस्तानचा माजी क्रिकेटर हसन रझाला (Hasan Raza) सुनावलं आहे. हसन रझाने एकदिवसीय वर्ल्डकपदरम्यान (Cricket World Cup 2023) भारतीय गोलंदाजांबद्दल अजब दावा केला होता. यावरुन बराच वाद झाला होता. वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीने यावर भाष्य कऱणं टाळलं होतं. पण अखेर तो व्यक्त झाला असून, मत्सरता स्पष्ट दिसत आहे, तुम्हाला यामधून चांगले निकाल मिळणार नाहीत असा टोला लगावला आहे.
हसन रझाने वर्ल्डकपदरम्यान भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर शंका उपस्थित केली होती. वर्ल्डकपदरम्यान मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज जबरदस्त कामगिरी करत असल्याने त्यावर भाष्य करताना हसन रझाने आयसीसी भारतीय गोलंदाजांना वेगळा चेंडू देत असावा असं विधान केलं होतं. आयसीसी भारतीय गोलंदाजांना वेगळा चेंडू देत असल्याने त्यांना अतिरिक्त स्विंग मिळत असल्याचं हसन रझाने म्हटलं होतं. यावरुन वाद झाल्यानंतर पाकिस्तानच्याही अनेक खेळाडूंनी हसन रझाला सुनावलं होतं. अनेकांनी तर त्यांची खिल्ली उडवली होती.
काय म्हणाला होता हसन रझा?
"चेंडू दुसऱ्या इनिंगमध्ये बदलला जात आहे असं दिसत आहे. मला वाटतं आयसीसी, अम्पायर किंवा बीसीसीय भारतीय गोलंदाजांना वेगळा चेंडू देत आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 350 धावा केल्या आणि पाठलाग करणाऱ्या संघाचा सर्वांगीण पराभव झाला. ज्याप्रकारे मोहम्मद शमीने पहिला चेंडू टाकला, तो पाहून अँजेलो मॅथ्यूजलाही आश्चर्च वाटलं. आम्ही खेळायचो तेव्हा एकच चेंडू होता. तोच वापरला जात असे आणि दोन प्रकारे स्विंग होत असे," असं हसन रझा म्हणाला होता. वानखेडे मैदानात भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यानंतर त्याने हे भाष्य केलं होतं.
भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावत 357 धावा केल्या होत्या. यानंतर श्रीलंका संघ फक्त 55 धावांवर बाद झाला होता. भारताने 302 धावांनी हा सामना जिंकला होता.
मोहम्मद शमीने हसन रझाच्या विधानावर प्रतिक्रिया दिली असून, भारतीय संघाच्या कामगिरीमुळे मत्सर निर्माण झाल्याचं दिसत आहे असं म्हटलं आहे. "एकमेकांच्या यशाचा आनंद लुटता येत नसल्याने त्याने क्रिकेटला एक जोक बनवलं आहे. जेव्हा तुमचं कौतुक होतं तेव्हा तुम्ही आनंदी होता. पण जेव्हा तुम्ही पराभूत होता तेव्हा आपली फसवणूक झाली आहे असं वाटतं. आम्ही संघात खेळताना केलेले रेकॉर्ड एकदा पाहा. तुम्ही त्याच्या जवळपासही नव्हता हे लक्षात येईल. मत्सर तर पूर्ण दिसत आहे. अशाने तुम्हाला चांगला निकाल मिळणार नाही".
याआधी भारताचा माजी क्रिकेटर आणि समालोचक आकाश चोप्राने हसन रझावर टीका करताना चांगली कॉमेडी केली म्हणत खिल्ली उडवली होती. दुसरीकडे पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमनेही खिल्ली उडवत आपल्याला काय बोलावं सुचत नसल्याचं म्हटलं होतं. तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची लाज काढत असल्याचंही त्याने म्हटलं होतं.