Mohammed Shami Trolled Rohit Sharma Rahul Dravid: भारतीय संघातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक म्हणजे मोहम्मद शमी! शमी दुखापतीमुळे मागील काही महिन्यांपासून मैदानात उतरलेला नसून सध्या तो दमदार कमबॅकची तयारी करत आहे. खरं तर यापूर्वी शमीने टी-20 असो कसोटी असो किंवा एकदिवसीय क्रिकेट असो सर्वच फॉरमॅटमध्ये संघासाठी उत्तम कामगिरी केली आहे. मात्र असं असतानाही मागील वर्षी झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये शमीला अंतिम 11 खेळाडूंमध्ये संधी न देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र नंतर शमीला संधी मिळाली आणि त्याने संधीचं सोनं केलं. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडल्याने त्याच्याऐवजी शमीला संधी मिळाली. शमीने इतकी उत्तम कामगिरी केली की त्याने थेट मालिकावीर पुरस्कार पटकावला.


शमीची शाब्दिक फटकेबाजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएट क्रिकेट पुरस्कार सोहळ्यामध्ये शमीला आधी संधी मिळाली नाही आणि नंतर संधी देण्यात आल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शमीने समोर बसलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची फिरकी घेतली. मला त्यांनी संघात संधी दिल्यानंतर मी इतकी उत्तम कामगिरी केली की मला पुन्हा संघातून काढण्याची वेळ कर्णधार आणि प्रशिक्षकांवर आली नाही, असं शमी म्हणाला. हे ऐकून सारेच हसू लागले. "मला याची सवय झाली आहे," असं म्हणत शमीने आधी संघाबाहेर बसणं आणि नंतर संधी मिळाल्यावर उत्तम कामगिरी करण्यासंदर्भात भाष्य केलं. 


नाहीतर केवळ पाणी देण्याचं काम...


"2015, 2019 आणि 2023 मध्येही असं घडलं. माझी सुरुवात अशीच झाली होती. मला संधी देण्यात आली तेव्हा मी उत्तम कामगिरी केली. त्यामुळे त्यांनी पुन्हा मला वगळण्याचा विचार केला नाही. तुम्ही याला माझे कष्ट म्हणू शकता. मात्र मी कायमच संधी मिळेल या दृष्टीने तयार असतो. अशापद्धतीने तुम्ही तयार असाल तेव्हाच तुम्हाला उत्तम कामगिरी करता येते. असं असेल तर मला केवळ लोकांना पाणी पाण्यासाठी मैदानात पळावं लागलं असतं. तुम्हाला संधी मिळते तेव्हा तिचा पुरेपूर फायदा घेणं अधिक महत्त्वाचं वाटतं," असं शमी म्हणाला. शमी असा मनमोकळेपणे बोलत असल्याचं पाहून समोर बसलेला रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांना हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. 



एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेनंतर शमी भारतीय संघातून खेळलेला नाही. जखमी असल्याने तो मैदानापासून दूर असून उपाचारांनंतर आता तो पुन्हा संघात दाखल होणार आहे. 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या सामान्यापासून शमी पुन्हा संघात दिसेल.