मुंबई : भारतीय टीम सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. पण एमएस धोनी मात्र क्रिकेट खेळताना दिसत नाहीये. टी-२० क्रिकेटमधून धोनीला वगळण्यात आलं तर धोनीनं त्याआधीच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे धोनी आता थेट जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज खेळेल. याआधी धोनी वेस्ट इंडिजविरुद्ध नोव्हेंबरमध्ये शेवटची वनडे खेळला होता. म्हणजेच २ महिन्यांच्या विश्रांतीनंतर धोनी मैदानात उतरेल. वेळ असतानाही धोनीनं ५० ओव्हरची स्पर्धा असलेली विजय हजारे ट्रॉफी खेळली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टीमचे माजी खेळाडू मोहिंदर अमरनाथ यांनी धोनीनं स्थानिक क्रिकेटमध्ये खेळलं पाहिजे, असा सल्ला दिला आहे. जर तुम्ही क्रिकेटच्या एकाच फॉरमॅटमध्ये खेळत असाल तर तुम्हाला स्थानिक क्रिकेटमध्ये खेळलंच पाहिजे. स्थानिक क्रिकेटमध्ये खेळलेल्या खेळाडूंचीच भारतीय टीममध्ये निवड झाली पाहिजे, असं अमरनाथ यांना वाटतंय.


स्थानिक क्रिकेटमध्ये खेळाडू कसा खेळतोय हे बघून त्याची निवड व्हावी. तुम्ही आधी जी काही कामगिरी केली तो इतिहास होता. तुमचा सध्याचा फॉर्म महत्त्वाचा आहे, असं अमरनाथ म्हणाले. अनेक वरिष्ठ खेळाडू स्थानिक क्रिकेट खेळत नाहीत. बीसीसीआयनं याबद्दलचे नियम बदलावेत, अशी मागणीही अमरनाथ यांनी केली.


याआधी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही खेळाडू स्थानिक क्रिकेट का खेळत नाहीत यावर प्रश्न उपस्थित केले होते. टेस्ट टीमच्या बाहेर असलेला शिखर धवन रणजी ट्रॉफी खेळत नसल्याबद्दल गावसकर यांनी आक्षेप घेतले.