चटगांव : बांगलादेशचा क्रिकेटपटू मोमिनुल हकनं भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. यावर्षामध्ये मोमिनुल हकनं टेस्ट क्रिकेटमध्ये ४ शतकं केली आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये मोमिनुल हकनं १२० रनची खेळी केली आहे. हे त्याचं वर्षभरातलं टेस्ट क्रिकेटमधलं चौथं शतक आहे. २७ वर्षांच्या मोमिनुल हकनं इनिंगच्या ५०व्या ओव्हरमध्ये रॉस्टन चेसच्या बॉलिंगवर फोर मारून शतक पूर्ण केलं. १६७ बॉलमध्ये १२० रनची खेळी केल्यानंतर फास्ट बॉलर शेनॉन गॅब्रियलनं हकला माघारी पाठवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोमिनुल हकनं याचवर्षी याच मैदानात श्रीलंकेविरुद्ध २ शतकं केली होती. विराटनं यावर्षी १० टेस्टमध्ये ४ शतकं केली आहेत. मोमिनुल हकनं यावर्षी ७ टेस्ट मॅचमध्येच ४ शतकं केली. कमी मॅच खेळून मोमिनुलनं एकाप्रकारे विराटला मागे टाकलं आहे.


या शतकानंतर मोमिनुलची तुलना विराटबरोबर होऊ लागली. पण विराटचा स्तर माझ्यापेक्षा उंच आहे, असं मोमिनुल हक म्हणाला. अजून वर्ष संपलेलं नाही आणि आणखी टेस्ट मॅचही बाकी आहेत. दुसरी इनिंग आणि दुसरी टेस्ट मॅचही अजून झालेली नाही. त्यामुळे या सगळ्याबाबत मी विचार करत नाही. सध्या मी माझी बॅटिंग सुधारण्याकडे लक्ष देत आहे. मला टीमसाठी अधिक योगदान द्यायचं आहे, अशी प्रतिक्रिया मोमिनुल हकनं दिली आहे.


मोमिनुलच्या खेळीमुळे पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी बांगलादेशनं ८ विकेट गमावून ३१५ रन केले होते. बांगलादेशकडून इमरूल कायेसनं ४४ आणि कर्णधार शाकीब अल हसननं ३४ रन केले. बांगलादेशनं आठवी विकेट २५९ रनवर गमावली होती. पण तैजुल इस्लाम आणि नईम हसननं ५६ रनची पार्टनरशीप करून बांगलादेशचा स्कोअर ३००च्या पुढे नेला. तैजुल इस्लाम ३२ रनवर आणि नईम हसन २४ रनवर नाबाद आहे. वेस्ट इंडिजकडून शॅनन गॅब्रियलनं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. दिवसाअखेर बांगलादेशचा स्कोअर ३१५-८ एवढा आहे.