निम्म्याहून अधिक एटीएम होणार बंद, इतक्या जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
एटीएम बंद झाली तर हजारो लोक बेरोजगार होण्याची भीती...
नवी दिल्ली : सरकारी नियामकांनी केलेल्या काही महत्वाच्या बदलांमुळे आता देशातील २ लाख ३८ हजार एटीएमपैकी जवळपास निम्मी एटीएम मार्च २०१९मध्ये बंद होण्याची भीती व्यक्त होतेय. एटीएम व्यवसायातील कंपन्यांच्या संघटनेनं हा इशारा दिलाय. 'एटीएम बंद झाली तर हजारो लोक बेरोजगार होतील', असं संघटनेचं म्हणणं आहे. 'एटीएमच्या सेवा देणाऱ्या कंपन्यांना नव्या नियमांमुळे सेवा देणं अत्यंत दुरापास्त झाल्यानं एटीएम बंद करण्यावाचून दुसरा पर्याय उरलेला नसल्याचं', संघटनांनी म्हटलयं.
नियमांत बदल
गेल्या काही महिन्यात सरकारनं नियमात केलेल्या बदलमांमुळे एटीएमसाठी लागणारे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा दोन्हीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे.
सुमारे ३ हजार कोटींच्या वर जाणारी खर्चाची रक्कम एटीएम सेवा देणाऱ्या कंपन्यांना परवडणारी नाही.
मोबदला कमी
रोख रक्कम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी सेवा देणाऱ्या कंपन्यांना मिळणारा मोबदलाही मार्च महिन्याअखेरीस कमी होणार आहे.
त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागात एटीएम सेवा देणे अजिबात परवडणार नसल्याचं कंपन्यांच्या संघटनेचं म्हणणं आहे.