भारतीय बॅडमिंटन स्टार पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह (MS Dhoni) झालेल्या भेटीचा एक किस्सा सांगितला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई कऱणारा पारुपल्ली कश्यप हा भारताची माजी पहिल्या क्रमांकाची बॅडमिंटन स्टार सायना नेहवालशी (Saina Nehwal) लग्न केलं आहे. पारुपल्ली कश्यप आणि सायना नेहवालने एका पॉडकास्टला हजेरी लावली होती. यावेळी त्याने एका लग्नात महेंद्रसिंग धोनीची भेट झाल्यानंतर नेमकं काय झालं होतं हा किस्सा सांगितला. प्रत्येकजण बॅडमिंटन पाहत नसल्याने मी धोनीला आपण सायना नेहवालचा पती आहे अशी ओळख करुन दिली होती असं त्याने सांगितलं. पण यावर धोनीने जी प्रतिक्रिया दिली ती आपल्याला अनपेक्षित होती अशी माहिती त्याने दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पारुपल्ली कश्यपने सांगितलं की, धोनीने आपण तुला आधीपासून ओळखतो असं सांगताना संघातील एखाद्या सहकाऱ्याप्रमाणे गप्पा मारल्या. "मी नुकतंच धोनीला एका लग्नात भेटलो होतो. मी त्याचा खूप मोठा चाहता आहे. मी सायना नेहवालचा पती आहे अशी ओळख त्याला करुन दिली. मी सायनाचा पती असल्याने ज्यांना स्पोर्ट्सची आवड आहे ते मला ओळखतील असं मला वाटलं होतं. मी क्रिकेट आणि धोनीचा चाहत आहे. मी जेव्हा त्याला ओळख सांगितली तेव्हा तो म्हणाला, 'मला माहिती आहे. मी बॅडमिंटन खेळतो. तू कोण आहेस हे मला माहिती आहे आणि तुला मी सायनाची पती आहे हे सांगण्याची गरज नाही'. तो माझ्याशी एखाद्या मित्राप्रमाणे बोलला. जणू काही आम्ही एका संघात होतो", असं पारुपल्ली कश्यपने सांगितलं. 


महेंद्रसिंग धोनीला थाला नावानेही ओळखलं जातं. त्याच्या नेतृत्वात भारताने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत. यामध्ये एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्डकपचा समावेश आहे. तसंच चेन्नईचं नेतृत्व करताना पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे. 


धोनीने दीड दशकाच्या कालावधीत 350 एकदिवसीय सामने खेळले आणि 50.58 च्या सरासरीने 10,773 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 90 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केले आणि 38.09 च्या सरासरीने 5000 च्या जवळपास धावा केल्या. आयपीएलमध्ये त्याने 5000 हून अधिक धावा केल्या आहेत. भारताच्या माजी कर्णधाराने नुकताच त्याचा 43 वा वाढदिवस साजरा केला. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा केल्यानंतर धोनी फक्त इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळतो.


कश्यपला ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरल्यानंतर 2012 मध्ये सरकारकडून अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 2014 ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्येही त्याने पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकलं होतं.