चेन्नई : कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या ७९ धावांच्या शानदार खेळीनंतरही चेन्नईला आपल्या घरच्याच मैदानावर पंजाबकडून पराभव स्वीकारावा लागला.  या हंगामातील चेन्नईचा घरचा मैदानावर पहिलाच पराभव आहे. आतापर्यंत चेन्नईने दोन सामने जिंकलेत. मात्र त्यांना तिसऱ्या सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले. चेन्नईकडून धोनीने खेळपट्टीवर टिकून राहत ७९ धावांची खेळी केली मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. चेन्नईला २० षटकांत ५ विकेट राखत १९३ धावा करता आल्या.


पाठदुखी असतानाही धोनी खेळपट्टीवर टिकून राहिला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामना सुरु असताना धोनीची पाठ दुखत होती. त्यामुळे फलंदाजी करण्यास त्रास होत होता. मात्र हा त्रास होत असतानाही त्याने टिच्चून फलंदाजी केली. त्याने ४४ चेंडूचा सामना करताना ६ चौकार आणि पाच षटकार ठोकले. शेवटच्या ५ षटकांत चेन्नईला जिंकण्यासाठी ७६ धावांची गरज होती. धोनीच्या पाठदुखीमुळे हे आव्हान अशक्य वाटत होते. १८व्या आणि १९व्या ओव्हरमध्ये १९-१९ धावा केल्यानंतर शेवटच्या ६ चेंडूत १७ धावा हव्या होत्या. मात्र चेन्नईला १२ धावाच करता आल्या.


सामना संपल्यानंतर प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला, पंजाबने चांगली गोलंदाजी केली म्हणून आम्ही हरलो. पाठदुखीबाबत बोलताना धोनी म्हणाला, माझी पाठ प्रचंड दुखतेय. मात्र देवाने मला ताकद दिलीये त्यामुळे पाठीच्या सहाय्याने मोठे शॉट लगावण्याची गरज पडत नाही. मला माझ्या खांद्यावर विश्वास आहे.