मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने गुरुवारी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. १५ ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी धोनीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. नरेंद्र मोदी यांनी धोनीला पत्र पाठवून भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानासाठी त्याचे कौतुक केले होते.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शुभेच्छांसाठी महेंद्रसिंह धोनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. धोनीने म्हटले आहे की, एक कलाकार, एक सैनिक आणि एक खेळाडू यांना प्रशंसेची भूक असते. त्यांची मेहनत आणि त्यागाची प्रत्येकाने दखल घ्यावी, असे त्यांना वाटत असते. तुम्ही केलेली प्रशंसा आणि शुभेच्छांसाठी आभारी आहे, असे धोनीने सांगितले. 



यापूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही धोनीच्या निवृत्तीनंतर त्याला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. धोनीने भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानासाठी त्याच्या जगभरातील असंख्य चाहत्यांप्रमाणेच मीदेखील त्याला धन्यवाद देऊ इच्छितो. त्याच्या संयमी वृत्तीमुळे अनेक सामने भारताच्या बाजूने झुकले. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषकाला गवसणी घातली. आपल्या अनोख्या शैलीने धोनीने नेहमीच सर्वांना मंत्रमुग्ध केले. आगामी काळातही तो भारतीय क्रिकेटविश्वासाठी योगदान देत राहील, अशी आशा मी करतो. माही, जागतिक क्रिकेट हेलिकॉप्टर शॉटची आठवण काढेल, अशी स्तुतीसुमने अमित शाह यांनी उधळली होती.