मुंबई: खेळ कोणताही असो पण त्यामध्ये चाहत्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. क्रिकेटमध्ये देखील चाहते भरभरून खेळाडूंवर प्रेम करतात. मात्र काहीवेळा हेच चाहते अडचणीचे प्रसंगही निर्माण करत असल्याचे काही किस्से देखील घडले आहेत. खेळाडूंवर प्रेमापोटी चाहते आपापसातही भिडल्याची अशीच एक घटना समोर आली होती. आयपीएल दरम्यान तर असे प्रसंग सऱ्हास पाहायला मिळतात. मात्र चक्क टीम इंडियातील खेळाडूंसाठी दोन गटांत तुंबळ हाणामारी रंगल्याचा प्रकार समोर आला होता. आज तो किस्सा नेमका काय होता हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिटमॅन रोहित शर्मा आणि कॅप्टन कूल धोनी हे दोन्हीही खूप प्रसिद्ध आणि चाहतेही तेवढेच. मात्र या दोघांचेही चाहते आपापसात भिडले आणि घोळ झाला. दोन वर्षांपूर्वीची ही घटना आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात माही आणि रोहितचे चाहते आपसात भिडले होते. 



धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी शहरभर पोस्टर आणि बॅनर लावायला सुरुवात केली. त्यावेळी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माचे नाव पुढे आलं होतं. त्यामुळे हिटमॅनच्या चाहत्यांनी त्याचे पोस्टर्स लावायला सुरुवात केली. दोन्ही गट एकमेकांच्या पोस्टर्सवरून भांडायला लागले. हा वाद इतक्या टोकाला पोहोचला की थेट उसाच्या शेतात दोन्ही गट भिडले.


रोहित शर्माचे चाहते त्यानंतर उसाच्या शेतात घुसून धोनीच्या चाहत्यांना मारहाण करू लागले. याबाबत माहिती देताना माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही त्यावेळी ट्विट केलं होतं. या घटनेनंतर सेहवागनं मारहाण करणाऱ्या चाहत्यांना वेडं म्हटलं होतं. 


क्रिकेट खेळणारे खेळाडू एकमेकांशी प्रेमाने वागतात, मिळून मिसळून राहतात परंतु कधीकधी या खेळाडूंचे चाहते सर्वकाही विसरतात आणि एकमेकांच्या जीवावर उठत मारहाण करतात. हा किस्सा आजही तेवढाच गाजला आहे. विरेंद्र सेहवाग यांचं ट्विट पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.