मुंबई : महेंद्रसिंग धोनीचं धक्कातंत्र पुन्हा एकदा साऱ्यांना पाहायला मिळालं. आपल्या निवडीवरुन वाद होणार हे लक्षात येताच धोनीनं स्वत:हून विंडीज दौऱ्यातून माघार घेतली. दरम्यान वाढत्या दबावापुढे तर धोनीनं हे एक पाऊन मागे घेतलं नाही ना या चर्चेलाही उधाण आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिस्टर कूलनं आपल्या एका निर्णयानं साऱ्यांना कूल करुन टाकलं. विंडीज दौऱ्यासाठी धोनीला संधी दिली जाणार की नाही? याकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या असताना धोनीनं स्वत:हूनच या दौऱ्यातून माघार घेतली आहे. आगामी दोन महिने आपण निमलष्करी रेजिमेंटला वेळ देणार असल्यानं विंडीज दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचं त्यानं बीसीसीआयला कळवलंय.


धोनीनं सेनेच्या मुख्यालयाकडून टेरीटोरियल आर्मीच्या युनिटसोबत काही दिवस तैनात करण्याची परवानगी मागितलीय. धोनीच्या या प्रस्तावावर सेनाध्यक्ष विचार करत आहेत. २०११ मध्ये धोनीला टेरीटोरियल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये 'लेफ्टनन्ट कर्नल' ही मानद रँक देण्यात आलीय. 


दरम्यान आपण निवृत्तीची घोषणा करणार नसल्याचंही त्यानं स्पष्ट केलंय. निमलष्करी तळावर दोन महिने व्यतित करण्याचं आपण यापूर्वीच ठरवल्याचंही धोनीनं स्पष्ट केल्याचं एका बीसीसीआय अधिकाऱ्यांनी सांगितलं. 


विश्वचषकामधील धोनीची खराब कामगिरी पाहता आता धोनीनं क्रिकेटला रामराम ठोकावा, अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे. अशातच विंडीज दौऱ्यावर त्याची निवड करावी की नाही? हा मोठा यक्षप्रश्न उभा ठाकला होता. बीसीसीआय आणि काही माजी क्रिकेटपटूंकडून धोनीवर निवृत्तीचा दबाव वाढत आहे. 


अशा परिस्थितीत एक उत्तम पर्याय धोनीनं शोधून काढला असं म्हणावं लागेल. किंवा निवृत्तीच्या दिशेनं त्यानं टाकलेलं हे पहिलं पाऊलही म्हणावं लागेल. कारण क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लष्करी जवानांसोबत काम करायची इच्छा त्यानं यापूर्वीच बोलून दाखवली आहे. तूर्तात दोन महिने तरी त्यानं आपल्यावरील टीकाकारांना शांत केलंय. 


आता रणनीतीकार मानल्या जाणाऱ्या धोनीची पुढची चाल काय असेल हे त्याला चांगलं ओळखणारेही सांगू शकत नाहीत. त्यामुळे पाहूयात धोनी पुढचा धक्का काय देतो ते...