रांची : क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षीनं आज रांचीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर धोनीनं अनोख्या पद्धतीने जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यानं मतदानानंतर सोशल मीडियावर केवळ आपला फोटो अपलोड केला नाही, तर आपली लाडकी लेक झिवासमवेत एक व्हिडिओच शेअर केला. त्यामध्ये झिवा आपल्या आई-वडिलांसारखे तुम्हीही मतदान करा असं सांगत आहे. हा व्हिडिओ धोनीनं इन्स्टाग्रामवर अपलोड केलाय. धोनीबरोबरच आयपीएलच्या चेन्नई टीमनेही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झारखंडमध्ये आज पाचव्या टप्प्याचं मतदान पार पडलं. यासाठी धोनी आणि त्याची पत्नी रांचीमध्ये आले होते. मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच मंगळवारी धोनीच्या नेतृत्वात चेन्नईची टीम मुंबईविरुद्ध प्ले ऑफचा पहिला सामना खेळेल.



धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ सालची आयपीएल जिंकली आहे. धोनी आणि रोहित शर्मा हे सर्वाधिक ३ वेळा आयपीएल जिंकणारे कर्णधार आहेत. तर चेन्नई आणि मुंबई यांच्याकडे सर्वाधिक ३ आयपीएल ट्रॉफी आहेत. मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१७ साली आयपीएल जिंकली होती.


चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता या मॅचला सुरुवात होईल. नेहमी आयपीएलचे सामने हे रात्री ८ वाजता सुरु होतात, पण प्ले-ऑफ आणि फायनल संध्याकाळी ७.३० वाजता सुरू करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.


मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये ज्या टीमचा विजय होईल ती टीम फायनलमध्ये पोहोचेल, तर पराभव झालेल्या टीमला क्वालिफायर-२ मध्ये पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळेल. त्या मॅचमध्ये विजयी झालेली टीम फायनल गाठेल.