एका सामन्यात १००९ धावा करणाऱ्या प्रणवने नाकारली स्कॉलरशिप
कल्याणच्या प्रणव धनावडेने दीड वर्षांपूर्वी इंटरस्कूल स्पर्धेतील सामन्यात तब्बल १००९ धावा करताना नवा इतिहास रचला होता.
मुंबई : कल्याणच्या प्रणव धनावडेने दीड वर्षांपूर्वी इंटरस्कूल स्पर्धेतील सामन्यात तब्बल १००९ धावा करताना नवा इतिहास रचला होता. प्रणव या विक्रमाने चांगलाच चर्चेत आला होता.
१५ वर्षीय प्रणव एका डावात १०००हून अधिक धावा बनवताना क्रिकेटमधील ११७ वर्षांचा विक्रम तोडला होता. हा विक्रम आजही काय आहे. प्रणवने हा विक्रम केल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याला पाच वर्षांसाठी १० हजार रुपये वार्षिक स्कॉलरशिप देण्याची घोषणा केली होती.
स्कॉलरशिप परत करण्याचा निर्णय
प्रणवने आता ही स्कॉलरशिप बंद करण्याची विनंती मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे केली आहे. स्कॉलरशिप परत करण्याचा निर्णय प्रणवचे वडील आणि प्रशिक्षकांनी मिळून घेतलाय.
प्रणवचे प्रशिक्षक म्हणतात...
प्रशिक्षक शेख यांच्या माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी प्रणवने केलेल्या दमदार खेळीनंतर त्याच्यावर अपेक्षांचे ओझे वाढले. त्यामुळे तो अनुरुप कामगिरी करु शकलेला नाहीये. प्रणवला एक चांगला क्रिकेटर बनण्यासाठी पुन्हा शून्यापासून सुरुवात करायची आहे.. त्यामुळे त्याचे वडील आणि मी आम्ही दोघांनी मिळून स्कॉलरशिप परत करण्याचा निर्णय़ घेतलाय.
दरम्यान, वडील आणि प्रशिक्षकाच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत प्रणव म्हणाला, १००९ धावांची खेळी ही जुनी गोष्ट झाली. मला माझ्या खेळावर अधिक मेहनत घ्यावी लागेल.