`सुशांतला दिलेलं वचन पूर्ण करायच्या जवळ पोहोचलो पण`, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची खंत
बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने रविवारी वांद्र्यातल्या त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने रविवारी वांद्र्यातल्या त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधल्या अनेकांनी हळहळ व्यक्त केली. तर दुसरीकडे सुशांतच्या आत्महत्येमुळे आयपीएलमधल्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूलाही धक्का बसला आहे. सुशांतला दिलेलं वचन आपण पूर्ण करू न शकल्याची खंत मुंबई इंडियन्सचा खेळाडू दिग्विजय देशमुखने व्यक्त केली आहे.
दिग्विजय देशमुखने सुशांत सिंग राजपूतसोबत काय पो छे या चित्रपटात काम केलं होतं. 'जोपर्यंत मी चांगला क्रिकेटपटू होत नाही, तोपर्यंत मी तुला भेटणार नाही, असं वचन मी सुशांतला दिलं होतं. यावर्षी मुंबईकडून खेळण्यासाठी जेव्हा माझी निवड झाली, तेव्हा मी सुशांतला भेटायचं ठरवलं. पण लॉकडाऊनमुळे मी त्याला भेटू शकलो नाही, आणि आता तो आपल्यात नाही,' असं दिग्विजय देशमुख म्हणाला आहे.
दिग्विजय देशमुख याने अली हाशमीच्या काय पो छे या चित्रपटातही काम केलं आहे. २०१३ साली आलेल्या या चित्रपटात दिग्विजय देशमुख सुशांतसिंग राजपूत, अमित साध, राजकुमार राव, मानव कौल यांच्यासोबत दिसला. सुशांत, अमित आणि राजकुमार हे एका लहान मुलाला मोठा क्रिकेटपटू बनवण्यासाठी झटत असतात. या मुलाचं काम दिग्विजय देशमुखने केलं आहे. १४ वर्षांचा असताना दिग्विजय या चित्रपटात दिसला, आता ७ वर्षानंतर त्याने रणजीमध्ये महाराष्ट्राकडून पदार्पण केलं.
आयपीएलच्या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्विजय देशमुखला २० लाख रुपयांची बोली लावून खरेदी केलं.