मुंबई : मुंबई शरीरसौष्ठवाची जान आणि शान असलेली मुंबई श्री जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा पीळदार संघर्ष शनिवारपासून सुरू होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक फेरीसाठी तब्बल १५० पेक्षा अधिक दिग्गज, उदयोन्मुख आणि होतकरू शरीरसौष्ठवपटूंची शनिवारी सकाळपासूनच कांदिवलीच्या ग्रोवेल मॉलवर गर्दी होणार असून ९ गटांत होणाऱ्या प्राथमिक फेरीतून ५४ खेळाडूंची निवड केली जाणार आहे. मुंबई श्री स्पर्धेच्या नीटनेटक्या आयोजनासाठी प्राथमिक फेरीतूनच मुंबई शरीरसौष्ठवाचे पीळदार ग्लॅमर निवडून स्पर्धेची अंतिम फेरी आणखी आकर्षक केली जाणार असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक क्रीडाप्रमी सिद्धेश रामदास कदम यांनी दिली.


बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना, मुंबई उपनगर शरीरसौष्ठव फिटनेस संघटना आणि शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मुंबई श्री स्पर्धेचं भव्य आणि दिव्य आयोजन करण्यात आलंय. नऊ गटांत होणाऱ्या या स्पर्धेत तब्बल ११ लाखांची रोख बक्षीसं देण्यात येतील. 'मुंबई श्री'चा मानकरी दीड लाखांचा तर उपविजेता ७५ हजारांचा मानकरी ठरेल. मात्र आता या दोन पुरस्कारांसह तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूलाही ३७.५ हजार रूपयांचे रोख इनाम उत्तेजनार्थ देणार असल्याचं सिद्धेश कदम यांनी जाहीर केलंय. ५४ खेळाडूंमध्ये होणारा 'मुंबई श्री'चा फैसला कांदिवली पूर्वेला ठाकूर संकुलात असलेल्या सेंट लॉरेन्स शाळेच्या पटांगणात लागेल.


पुढील आठवड्यात होणाऱ्या महाराष्ट्र श्रीसाठी मुंबईची संघ निवडही याच स्पर्धेतून केली जाणार आहे. त्यासाठी सुनीत जाधव, सागर कातुर्डे, रोहित शेट्टी, सचिन डोंगरे, अतुल आंब्रे आणि रोहन धुरी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू अंतिम फेरीत उतरणार आहे. हे प्रत्यक्ष स्पर्धेत नसले तरी तयारीत असलेल्या या खेळाडूंची आखीव-रेखीव देहयष्टी शरीरसौष्ठवप्रेमींना पाहायला मिळेल. बहुतांश खेळाडू मुंबई श्रीचे विजेते असल्यामुळे यंदाही एका नव्या विजेत्याला मुंबई श्रीचा बहुमान मिळणार आहे. स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडू उतरणार असले तरी सर्वांच्या नजरा आशुतोष साहाकडे लागलेल्या असतील. या उदयोन्मुख खेळाडूने गेल्या दोन महिन्यात ज्युनियर मुंबई श्री, ज्युनियर महाराष्ट्र श्री आणि ज्युनियर भारत श्री अशी अनोखी हॅटट्रीक साजरी केली आहे. तसेच सुजय पिळणकर, सौरभ साळुंखे, रोहन गुरव, सुशांत रांजणकर, दीपक तांबीटकर यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेल, अशी माहिती शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्ष अजय खानविलकर यांनी दिली.