मुंबई : कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा १३ रननी शानदार विजय झाला आहे. मुंबईनं ठेवलेल्या १८२ रनचा पाठलाग करताना कोलकात्यानं २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून १६८ रन केल्या. कोलकात्याकडून रॉबिन उथ्थपानं ३५ बॉलमध्ये सर्वाधिक ५४ रन केल्या. उथ्थपाच्या खेळीमध्ये ६ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. तर कोलकात्याचा कर्णधार आणि विकेट कीपर दिनेश कार्तिकनं २६ बॉलमध्ये नाबाद ३६ रन केल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्यानं ४ ओव्हरमध्ये फक्त १९ रन देऊन २ विकेट घेतल्या. मॅकलेनघन, बुमराह, कृणाल पांड्या आणि मयंक मार्कंडेनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या मुंबईनं २० ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून १८१ रन केल्या आहेत. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकामुळे मुंबईला एवढ्या रनपर्यंत मजल मारता आली. यादवनं ३९ बॉलमध्ये ५९ रनची खेळी केली. यामध्ये ७ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. यादवबरोबर ओपनिंगला आलेल्या एव्हिन लुईसनं २८ बॉलमध्ये ४३ रन केले. लुईसनं ५ फोर आणि २ सिक्स लगावल्या. यादव आणि लुईसमध्ये ९१ रनची पार्टनरशीप झाली. यानंतर बॅटिंगला आलेल्या रोहित शर्माला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा ११ रनवर आऊट झाला. मुंबईनं या मोसमात जिंकलेल्या तिन्ही मॅचमध्ये रोहितचा स्कोअर २० रनपेक्षा जास्त होता. हार्दिक पांड्यानं २० बॉलमध्ये नाबाद ३५ रन केले. कोलकात्याकडून सुनिल नारायण आणि आंद्रे रसेलनं प्रत्येकी २ विकेट घेतल्या.


मुंबई पाचव्या क्रमांकावर


कोलकात्याविरुद्धच्या विजयानंतरही आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई पाचव्या क्रमांकावर कायम आहे. मुंबईनं खेळलेल्या १० मॅचपैकी ४ मॅचमध्ये त्यांचा विजय झाला तर ६ मॅचमध्ये पराभवाचं तोंड पाहायला लागलं. मुंबईकडे सध्या ८ पॉईंट्स आहेत. तर कोलकात्याची टीम पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकात्यानं १०पैकी ५ मॅच जिंकल्या तर ५ मॅच हरल्या. पॉईंट्स टेबलमध्ये कोलकात्याकडे १० पॉईंट्स आहेत.