अखेर कार्तिक-विजय मैदानात `एकत्र` येणार!
भारत आणि अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्टला बंगळुरूमध्ये सुरुवात झाली आहे.
बंगळुरू : भारत आणि अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्टला बंगळुरूमध्ये सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तानची ही पहिलीच टेस्ट मॅच आहे. टेस्ट मॅच खेळायची संधी मिळालेला अफगाणिस्तान हा 12वा देश आहे. याचबरोबर दिनेश कार्तिक आणि मुरली विजयसाठीही ही मॅच महत्त्वाची आहे. दिनेश कार्तिकनं 8 वर्षानंतर भारतीय टेस्ट टीममध्ये पुनरागमन केलं आहे. दिनेश कार्तिक आणि मुरली विजय पहिल्यांदाच एका टीमकडून खेळत आहेत. याआधी दोघांची पहिल्या 11 खेळाडूंमध्ये कधीच निवड झालेली नव्हती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर हे दोघंही टीममध्ये होते पण कार्तिकला 11 खेळाडूंमध्ये संधी देण्यात आलेली नव्हती.
कधी होते चांगले मित्र
मुळचे तामिळनाडूचे असलेले दिनेश कार्तिक आणि मुरली विजय एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघंही रणजी टीममध्ये तामिळनाडूकडून एकत्र खेळले होते. पण 2012 साली दिनेश कार्तिकची पत्नी निकितामुळे या दोघांच्या मैत्रीमध्ये कटुता आली. मुरली विजय आणि निकिताच्या अफेयरमुळे दिनेश कार्तिकनं निकिताला घटस्फोट दिला. 2012 सालीच निकिता आणि मुरली विजयनं लग्न केलं. यानंतर हे दोघं एका टीमकडून कधीच खेळले नव्हते. याबद्दल दोघांनी सार्वजनिक जीवनात कोणतंही भाष्य केलं नाही.
2010नंतर कार्तिक पहिल्यांदाच टेस्टमध्ये
2004 साली दिनेश कार्तिकनं भारतीय टीममध्ये पदार्पण केलं होतं. पण यानंतर कार्तिकला जास्त टेस्ट मॅच खेळता आल्या नाहीत. कार्तिकनं आत्तापर्यंत 27 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. 2010 साली बांगलादेशविरुद्ध कार्तिक शेवटची टेस्ट खेळला होता. तर मुरली विजयनं 2008 साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 2008 नंतर कार्तिक फक्त 4 टेस्ट मॅचच खेळला पण यावेळी दोघंही 11 खेळाडूंमध्ये नव्हते.