मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईच्या टीमला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यातच आता पुढच्या दोन वर्षांसाठी मुंबईच्या टीमला मोठा झटका बसला आहे. बांगलादेशचा फास्ट बॉलर मुस्तफिजूर रहमान पुढची २ वर्ष कोणतीही टी-२० लीग खेळणार नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन यांनी ही माहिती दिली आहे. टी-२० लीग खेळताना मुस्तफिजूर दुखापतग्रस्त होतो आणि त्यानंतर तो बांगलादेशकडून खेळू शकत नाही. हे असं आता चालणार नाही. दुखापतीनंतर मुस्तफिजूर बोर्डाकडून वैद्यकीय पुनर्वसन घेतो आणि नंतर टी-२० लीगमध्ये खेळायला जाऊन परत दुखापतग्रस्त होतो, असं नझमुल हक म्हणाले.


आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळताना मुस्तफिजूरच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो बांगलादेशकडून अजूनही खेळलेला नाही. २२ वर्षांचा मुस्तफिजूर बांगलादेशकडून १० टेस्ट, २७ वनडे आणि २४ टी-२० मॅच खेळला आहे. दुखापतीमुळे मुस्तफिजूरला अनेकवेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकावं लागलं. २०१६ साली इंग्लंडमधल्या टी-२० लीगदरम्यानही मुस्तफिजूरच्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये सराव करताना मुस्तफिजूरच्या पायाला दुखापत झाली.