Who Will Replace Dhoni As CSK Captain: चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी कर्णधार महेंद्र सिंह धोनीनंतर संघाची धुरा कोण स्वीकारणार यासंदर्भातील सूचक विधान केलं आहे. विश्वनाथ यांनी चेन्नईच्या संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांचा धोनीनंतरच्या कर्णधाराबद्दल काय विचार आहे याबद्दलचा खुलासा केला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचं यंदाच्या पर्वात नेतृत्व एम. एस. धोनी करणार आहे. यंदाचं आयपीएल 22 मार्चपासून सुरु होणार आहे. मात्र यंदाच्या पर्वामध्ये चेन्नईचा पुढील कर्णधार कोण असेल याबद्दलची चाचपणी करण्याचं कामही चेन्नईच्या व्यवस्थापनाला करावं लागणार आहे. 


दुखापतीमधून सावरुन धोनी सज्ज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी आयपीएलमधूनही निवृत्त होणार असल्याची चर्चा मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. मागील वर्षीच धोनीने आपण पुन्हा एकदा चाहत्यांसाठी मैदानात येऊ असं म्हटलं. चाहत्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे धोनी यंदाच्या पर्वात खेळणार असल्याचे त्याचे प्रॅक्टीस सेशन सुरु झाल्याने स्पष्ट होतं आहे. आपलं 2024 चं आयपीएलचं पर्व हे चाहत्यांसाठी माझ्याकडून रिटर्न गिफ्ट असेल असंही धोनीने स्पष्ट केलं आहे. धोनीला मागील आयपीएलच्या शेवटच्या सामन्याआधीच गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र पाचव्यांदा संघाला विजय मिळून दिल्यानंतर लगेच धोनी गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना झाला. त्याने या शस्त्रक्रीयेनंतर बरीच मेहनत घेतली आणि तो आता नव्या पर्वासाठी तयार आहे.


धोनी सध्या चेन्नईत करतोय सराव


धोनी मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये चेन्नईत सरावासाठी दाखल झाला आहे. तो सध्या चेन्नईमधील एम. ए. चिदम्बरम स्टेडियममध्ये चेन्नईच्या सरावसत्राचं नेतृत्व करत आहे. याच मैदानामध्ये पुढील आठवड्यात शुक्रवारी चेन्नई आणि आरसीबीदरम्यान यंदाच्या पर्वातील पहिला सामना खेळवला जणार आहे. चेन्नईचा संघ त्याचं जेतेपद वाचवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र धोनीकडे जेतेपद टिकवण्याबरोबरच पुढील पर्वासाठी कोण कर्णधार ठरु शकतो याचा शोध घेण्याची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.


श्रीनिवास यांनी स्पष्टच सांगितलंं


"आम्ही यासंदर्भात चर्चा केली आहे. मात्र श्रीनिवासन यांनी हे स्पष्ट केलं आहे की सध्या कर्णधार आणि उपकर्णधाराच्या नियुक्तीसंदर्भातील विषय टाळूयात. (कर्णधारपदासंदर्भात) जे काही असेल ते प्रशिक्षकांना आणि कर्णधाराला (धोनीला) ठरवू द्या. त्यांना काय ते ठरवू द्या आणि ते मला यासंदर्भात कळवतील. मला माहिती मिळाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील कर्णधार कोण हे प्रशिक्षक आणि विद्यमान कर्णधार दोघेच ठरवतील आणि त्यासंदर्भातील सल्ला देतील. मात्र तोपर्यंत याबद्दल काहीही न बोलण्याचा सल्ला आम्हाला देण्यात आला आहे," अशी माहिती सीएसकेचे सीईओ विश्वानाथ यांनी एस. बद्रीनाथ यांना युट्यूबवरील शोमध्ये दिली. 


जडेजाचा प्रयोग फसला


यापूर्वी चेन्नईच्या संघाने रविंद्र जडेजाकडे नेतृत्वाची धुरा सोपवली होती. आयपीएल 2022 च्या पर्वात हा प्रयोग करण्यात आलेला. मात्र हा प्रयोग फसला होता आणि अर्ध्यातूनच जडेजाकडून कर्णधारपद काढून पुन्हा ते धोनीकडे सोपवण्यात आलं होतं. पुढल्याच पर्वात धोनीच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला पराभूत करत चेन्नईने पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं.